PSI शेखर दाभोलकर:जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांची रेडी येथे घटनास्थळी भेट..

⚡वेंगुर्ला ता.१३-: वेंगुर्ला तालुक्यातील रेडी हुडावाडी येथील जंगलमय भागात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह मंगळवारी दुपारच्या सुमारास आढळून आला होता. त्यामुळे मृतदेहानुसार वेंगुर्ला तालुक्यात व सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.
दरम्यान याबाबत वेंगुर्ला पोलीस स्थानकामार्फत तत्परतेने कार्यवाही करत मृतदेह कोल्हापूर येथे शवविच्छेदन झाल्यानंतर ओरोस येथे शवागृहात ठेवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर संबंधिताचा मृत्यू कशामुळे झाला हे चित्र स्पष्ट होणार आहे, अशी माहिती तपासी अधिकारी पीएसआय शेखर दाभोलकर यांनी दिली. दरम्यान गुरुवारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी रेडी येथे घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. संबंधित मयतच्या फोटोनुसार व आढळलेल्या वस्तूनुसार माहिती असल्यास
वेंगुर्ला पोलीस स्थानकाशी संपर्क साधावा, असे आवाहन पीएसआय शेखर दाभोलकर यांनी केले आहे. दरम्यान रेडी येथील संबंधित मृतदेह बाबत वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 4 पोलीस पथके रत्नागिरी, कोल्हापूर, बेळगाव, गोवा आदी भागात ओळख पटविण्याच्या दृष्टीने कार्यान्वित करण्यात आली आहेत, अशी माहिती तपासी अधिकारी पीएसआय शेखर दाभोलकर यांनी दिली.
सदर मयत व्यक्तीचे वय सुमारे 45 ते 55 वर्षे असुन वेंगुर्ला पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. यातील मयत इसमाच्या फोटो वरून तसेच त्याच्या अंगावर स्काय ब्लू रंगाचा शर्ट, राखाडी रंगाची पॅन्ट तसेच पायात कलर्स असे लिहिलेले 6 नंबरचे चप्पल उजव्या हाताच्या मधल्या बोटात चांदीची अंगठी त्यामध्ये पर्पल कलरचा खडा आहे. सदर अनोळखी मयत इसम याला कोणी ओळखत असल्यास एपीआय हर्षद हिंगे, एपीआय शेष मोरे, पीएसआय योगेश कांबळे, पीएसआय शेखर दाभोलकर यांच्याशी अथवा वेंगुर्ला पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेसंदर्भात वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर हे अधिक तपास करीत आहेत.
