⚡वेंगुर्ला ता.२९-: सिमेंटचे पोते डोक्यावर घेऊन जात असताना पाय घसरून पडलेल्या खानोली-घोलेकरवाडी येथील अविराज आनंद घोंगे (वय-२३) या युवकाचा २८ डिसेंबर रोजी पहाटे ३ वाजता गोवा बांबूळी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेले १० दिवस मृत्यूशी झुंज देत असलेल्या अविराजची अखेर प्राणज्योत मावळली.
अविराज घोंगे हा युवक हा येथीलच खानोली-घोगळवाडी येथे आपल्या चुलत बहिणीच्या घरी कामासाठी गेला होता. यावेळी सिमेंटने भरलेले पोते डोक्यावरून घेऊन जात असताना त्याचा पाय घसरला व अविराज मागच्या मागे पडल्याने त्याच्या डोक्याला तसेच मानेला गंभीर दुखापत झाली होती. तात्काळ त्याला कुडाळ येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा बांबूळी येथे दाखल करण्यात आले होते. १८ डिसेंबर रोजी ही घटना घडली.
दरम्यान २६ रोजी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र २८ डिसेंबर रोजी पहाटे त्याची प्राणज्योत मावळली. यावेळी खानोली सरपंच सुभाष खानोलकर यांच्यासहित ग्रामस्थांनी गोवा येथे धाव घेतली. अविराज हा अत्यंत गरीब घरातील होता. त्याच्या पश्चात वडील व बहीण असा परिवार आहे. अविराज याच्या अपघाती मृत्यूमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.
