कलंबिस्त येथील दिशा फाउंडेशनतर्फे शितल शेळके यांना मदतीचा हात…

⚡सावंतवाडी ता.२८- : कलंबिस्त् हायस्कूल येथील १९९३-९४ १० वी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी यांनी स्थापन केलेल्या दिशा फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेतर्फे गर्भ पिशवीच्या कॅन्सरच्या आजाराने त्रस्त असलेल्या आंबेगाव-सटवाडी येथील शितल शेळके यांना एक आर्थिक मदतीचा हात देत दहा हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
यावेळी दिशा फाऊंडेशचे अध्यक्ष सतीश सावंत, सेक्रेटरी दीपक राऊळ, सह सेक्रेटरी सुषमा सावंत, खजिनदार प्रवीण कुडतरकर, सदस्य कल्पना सावंत आदी उपस्थित होते.
सावंतवाडी तालुक्यातील आंबेगाव-सटवाडी येथील शीतल विठ्ठल शेळके (३६) ह्या गेल्या सहा महिन्यांपासून गर्भ पिशवीच्या कॅन्सरच्या आजाराने त्रस्त आहेत. आत्तापर्यंत त्यांच्यावर लहान शस्त्रक्रिया झाल्या आहेत. मात्र शेळके यांच्या पुढील दोन शस्त्रक्रियेसाठी सुमारे पाच लाख रुपयांची गरज आहे. शितल शेळके आणि त्यांचे पती मोलमजुरी करून घर खर्च भागवतात. त्यांना इयत्ता तिसरी व चौथीत शिकणारी अशी दोन मुल आहेत. त्यांच्याकडे जमीन अथवा शेती सारख्या इतर उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नसल्यामुळे घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. अशा परिस्थितीत त्यांना सहा महिन्यांपूर्वी गर्भपिशवीचा कॅन्सर झाल्याचे निष्पन्न झाले. पुढील उपचारासाठी शेळके कुटुंबीयांनी कोल्हापूर तसेच गोवा येथे चौकशी केली असता शस्त्रक्रियेसाठी पाच लाख खर्च येणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले. ही शस्त्रक्रिया तात्काळ करावी अन्यथा तो आजार वाढू शकतो, असे डॉक्टरांकडून त्यांना सांगण्यात आले आहे. शेळके कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे शस्त्रक्रियेसाठी लागणारा पाच लाखांचा खर्च त्यांना करणे शक्य नाही. त्यामुळे त्यांनी समाजातील दानशूर व्यक्ती अथवा संस्थांना मदत करण्याचे आवाहन सोशल मिडीया तसचे वृत्त् पत्रातून केले होते. वरील सर्व परिस्थितीची माहिती वृत्त पत्राद्वारे कळताच शितल शेळके यांना तातडीची मदत दिल्यास त्यांना नवसंजीवनी मिळू शकते व तिच्या चेहऱ्यावरील हास्य पुन्हा फुलवण्यास आपली मदत होऊ शकते तसेच तिच्या दोन्ही चिमुरड्या मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य पुन्हा उमलण्यास मदत होऊ शकते याच हेतूने कलंबिस्त हायस्कूल येथील १९९३-९४ १०वी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी यांनी स्थापन केलेल्या दिशा वतीने शितल शेळके यांना दहा हजार चा धनादेश त्यांच्या निवासस्थानी जाऊन सुपूर्द करण्यात आला.

You cannot copy content of this page