आता ऑनलाइन जुगार पोलिसांच्या रडारवर…

कणकवलीत कारवाईचे अस्त्र उभारल्याने अनेकांचे धाबे दणाणले..

⚡कणकवली ता.२६-: कणकवली शहरातील ऑनलाइन जुगारा विरोधात पोलिसांनी मोहीम तीव्र केली असून कणकवली शहरातील पाच ते सहा जणांना ऑनलाइन जुगार प्रकरणी ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाईचे अस्त्र उगारण्यात आले आहे. कणकवली शहरातील काही युवक या ऑनलाइन जुगारात अडकले आहेत. याच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या होत्या. मात्र पोलिसांनी याप्रकरणी कायद्याचा अभ्यास करत हा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी दिली.

ऑनलाईन जुगार प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेले हे कणकवली शहरातील असून, गेले काही दिवस पोलीस यांच्या पाळतीवर होते. मंगळवारी दुपारी ऑनलाइन जुगार वाल्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केल्यानंतर काही जणांनी आपल्या मोबाईल मधील ॲप डिलीट केले. तर काहीजण पसार झाले आहेत. त्यांचा देखील शोध पोलीस घेत आहेत. तर काहीजण शहरातून पळाल्याची ही माहिती पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी दिली. दरम्यान पळ काढलेल्या काही जणांचे मोबाईल लोकेशन देखील तपासले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कणकवली शहरातील नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी केलेल्या या धडक कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

You cannot copy content of this page