डॉ. दिपक परब:श्री संत दादा महाराज दिनदर्शिकेचे प्रकाशन..
⚡मालवण ता.२६-: वायंगणी येथील श्री संत दादा महाराज यांची समाधी व दत्त मंदिर हे पवित्र स्थान असून येथे जो येईल त्याचे भलेच होईल. श्री संत दादा महाराज यांनी आपल्या मार्गदर्शनातून समाजाला दिशा देण्याचे काम केले. महाराजांच्या उपासकांसह इतरांनीही महाराजांवर आधारीत पुस्तके वाचून महाराजांचे महात्म्य जाणून घ्यावे हे महात्म्यच सुखी आणि समृद्ध जीवनासाठी मार्गदर्शक ठरेल असे प्रतिपादन मुंबईचे उद्योजक आणि श्री संत दादा महाराज यांचे निस्सीम भक्त डॉ. दिपक परब यांनी येथे बोलताना केले.
मालवण तालुक्यातील वायंगणी येथील श्री संत दादा महाराज – दत्त मंदिरात श्री संत दादा महाराज दिनदर्शिकेचे प्रकाशन आणि मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी दिपक परब हे बोलत होते. यावेळी रामदास प्रभू, नाना करमळकर,श्रीमती द्रौपदी परब, श्रीमती प्रमिला परब , हनुमंत प्रभू, सुरेश ठाकूर, प्रमुख गावकरी श्री. सावंत, सरपंच सौ. संजना रेडकर, चंद्रकांत हडकर, शांताराम टिकम, रुपेश अवसरे, समीर प्रभूचांदेरकर, श्री. रेवंडकर, मनीष राऊळगावकर , विनायक कोळबकर यांच्यासह बहुसंख्य भक्तगण उपस्थित होते. प्रारंभी रामदास प्रभू यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी बोलताना डॉ. दिपक परब म्हणाले, दादा महाराज यांनी त्यांच्या जीवनात अनेक समस्याना तोंड दिले. त्यांच्या मेहुण्याने देखील त्यांना त्रास दिला मात्र तरीही त्यांनी आपले कार्य सुरु ठेवले. आज नाना करमळकर यांच्यामुळे पुस्तकाद्वारे महाराजांची महती व महात्म्य आपल्या समोर आले आहे. रामदास प्रभू, हनुमंत प्रभू व इतर मंडळींनी आजपर्यंत महाराजांचे समाधी स्थळ व परिसर सांभाळला आहे. आज अनेकजण दादा महाराज यांच्या कृपे मुळेच वैयक्तिक व सामाजिक जीवनात यशस्वी झाले आहेत. जिल्हाभरासह गोव्या पर्यंत महाराजांचे उपासक पसरले आहेत. आज येथे येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. गावातील मंडळीही येथे उपस्थिती दर्शवीत आहेत. विखूरलेल्या उपासकांनाही या समाधी स्थळी येण्याची बुद्धी दादा महाराज यांनी द्यावी असे साकडे आपण महाराजांच्या चरणी घालत आहोत असेही दिपक परब म्हणाले.
यावेळी मनिष राऊळगावकर म्हणाले, दादा महाराजांशी जोडल्या गेलेल्या अनेक व्यक्तींना त्यांच्या जीवनात महाराजांच्या महात्म्याचा प्रत्यय आला आहे. तसेच अनेकांनी महाराजांच्या शिकवणुकीचा बोध घेतला आहे. नाना करमळकर यांच्यामुळे महाराजांची ही महती पुस्तक स्वरूपात प्रसाद म्हणून भेट देण्याची संधी आपल्याला मिळाली. सर्वांनी हे पुस्तक वाचावे व महाराजांचे जीवन जाणून घ्यावे असेही ते म्हणाले. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विनायक कोळंबकर, सीताराम करमळकर, पत्रकार प्रफुल्ल देसाई यांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत प्रभू यांनी केले.
