Headlines

सोनाली गावडे मृत्यूप्रकरणी सीआयडी चौकशी करा..

कुटुंबीयांची पोलीस निरीक्षकांकडे निवेदनद्वारे मागणी..

⚡बांदा ता.२८-: इन्सुली-कोठावळेबांध येथील कै. सोनाली प्रभाकर गावडे (वय २५) हिच्या संशयित मृत्यूप्रकरणी सीआयडीमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी कुटुंबीयांनी बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असली, तरी हा घातपात असल्याचा ठाम संशय व्यक्त करत न्याय मिळवून देण्याची मागणी यावेळी इन्सुली जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांनी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सोनाली गावडे ही ८ जुलै २०२५ रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास घरातून कामावर जाण्यासाठी निघाली होती. संध्याकाळपर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तिच्या कंपनीत चौकशी केली असता ती कामावर पोहोचली नसल्याचे समजले. त्यानंतर रात्री बांदा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. दुसऱ्या दिवशी (९ जुलै) सकाळी घरापासून सुमारे ६५० ते ७०० मीटर अंतरावर आणि कामावर जाणाऱ्या रस्त्यापासून सुमारे १०० फूट आत असलेल्या पाण्याच्या पाटात अवघ्या एक फूट पाण्यात तिचा मृतदेह आढळून आला.
बांदा पोलीसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून शवविच्छेदन अहवालात पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे नमूद आहे. मात्र, एक फूट पाण्यात बुडून मृत्यू होणे संशयास्पद असल्याचे सांगत कुटुंबीयांनी सोनालीचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पाण्यात टाकण्यात आल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करून वस्तुस्थिती समोर आणावी, तसेच कुटुंबीयांचे पुन्हा जबाब नोंदवून निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ, कासचे सरपंच प्रवीण पंडित, पंचायत समिती सदस्य सदा राणे तसेच कुटुंबीय अरुण गावडे, आदेश गावडे, अनामिका गावडे, रामचंद्र नाईक आदी उपस्थित होते. दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे यांनी कुटुंबीयांचे पुन्हा जबाब नोंदवून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
फोटो:-
बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे यांना निवेदन देताना जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ. सोबत इतर लोकप्रतिनिधी व गावडे कुरुंबीय. (छायाचित्र- नीलेश मोरजकर)

You cannot copy content of this page