नगराध्यक्ष संदेश पारकर ; १५ ऑगस्टला प्रांत कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा
कणकवली : कणकवली शहरातील मतदार नोंदणी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याचा आरोप करत नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी सोमवारी प्रांताधिकारी जगदीश कातकर यांची भेट घेऊन १२ मुद्द्यांचे सविस्तर निवेदन सादर केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी प्रशासनाने योग्य कारवाई न केल्यास १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहणानंतर प्रांत कार्यालयासमोर बोगस मतदार नोंदणीविरोधात बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
यावेळी उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, जयेश धुमाळे, रुपेश नार्वेकर, सत्यजित पारकर, सुमेधा अंधारी, निकीत मुरकर, भाऊ आरोलकर, उमेश आरोलकर, शीतल मांजरेकर, रामदास मांजरेकर, गौरव हर्णे, निलम पालव, चेतन अंधारी, उमेश वाळके, तेजस राणे, अमेय पारकर आदी उपस्थित होते.
पुढे श्री. पारकर यांनी सांगितले की, विशेष मतदार यादी पुनरिक्षण (SIR) मोहिमेदरम्यान शहरात वास्तव्यास नसलेल्या व्यक्तींची नावे मतदार यादीत समाविष्ट केली जात आहेत. काही ठिकाणी चार व्यक्ती राहू शकतील अशा घरांमध्ये ४० ते ४० मतदारांची नोंद झाल्याचा दावा त्यांनी केला. तसेच महाराष्ट्रातील इतर भाग, कर्नाटक, गोवा, परदेश तसेच इतर जिल्ह्यांमध्ये नाव असलेल्या व्यक्तींची नावे कणकवलीच्या मतदार यादीतही असल्याचा आरोप नगराध्यक्ष श्री. पारकर यांनी केला.
प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात पारकर यांनी शहरातील प्रत्यक्ष वास्तव्यास असलेल्या आणि बाहेर राहणाऱ्या मतदारांची पडताळणी कशा पद्धतीने केली जात आहे, बीएलओमार्फत घराघरांत सर्वेक्षण पूर्ण झाले आहे का, त्याचा अहवाल उपलब्ध करून देण्यात यावा, मतदार भागात राहत नसल्यास त्याचे नाव कमी करण्यासाठी कोणती प्रक्रिया राबविली जाते, तसेच नाव कमी करण्यापूर्वी संबंधित मतदाराला नोटीस देण्याची पद्धत काय आहे, याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. याशिवाय नव्याने नाव समाविष्ट करण्यास हरकत आल्यास सुनावणीची प्रक्रिया, एका मतदाराने नवीन ठिकाणी नाव नोंदविल्यानंतर जुन्या ठिकाणचे नाव वगळले गेले आहे की नाही याची खातरजमा, स्थलांतरित मतदारांची तपासणी, नोकरी किंवा शिक्षणासाठी बाहेर राहणाऱ्या मात्र कणकवलीत मालमत्ता असलेल्या नागरिकांच्या नावांबाबतचा नियम, अस्तित्वात नसलेली किंवा बंद घरे यांचा पंचनामा करण्याची प्रक्रिया,वगळावयाच्या मतदारांची यादी अंतिम करण्यापूर्वी ती नगरपंचायतीच्या निदर्शनास आणून देण्याची मागणी तसेच संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्याचा कालावधी जाहीर करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
बीएलओ प्रत्यक्ष घरभेटी न देता अर्ज कार्यकर्त्यांकडून भरून घेत असल्याचा आरोप करत पारकर यांनी मतदार नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा दावा केला. सरकारी यंत्रणा, शिक्षक आणि विविध विभागांतील कर्मचारी या मोहिमेत कार्यरत असतानाही चुकीच्या नोंदी रोखल्या जात नसल्याबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केला.
प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन देऊनही समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचा आरोप करत त्यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून योग्य अहवाल निवडणूक आयोगाकडे पाठविण्याची मागणी केली. अन्यथा १५ ऑगस्ट रोजी लोकशाही मार्गाने प्रांत कार्यालयासमोर उपोषण करून कायदेशीर लढाही सुरू ठेवणार असल्याचेही श्री. पारकर म्हणाले.
बॉक्स :
पारकरांनी ठोस पुरावेही दाखवले
माध्यमांशी संवाद साधताना संदेश पारकर यांनी बोगस याद्या व नाव नोंदणीचे काही प्रत्यक्ष पुरावे देखील संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे आता सर्वत्र खळबळ उडाली आली. बिएलओ नक्की काय काम करतात हे देखील शंखेचे झालेले आहे. त्यामुळे या घटनेला आता प्रांताधिकारी कसे हाताळतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
