⚡मालवण ता.२६-: भारतीय कृषक समाज नवी दिल्ली संलग्न भारतीय कृषक समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भारताचे पहिले कृषी मंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंती उत्सवा निमित्त कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल देण्यात येणारा कृषीभूषण पुरस्कार मालवण तालुक्यातील बांदीवडे येथील मिलिंद प्रभू यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण दि. २७ डिसेंबर राहुरी अहमदनगर येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे होणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख जयंती सोहळा व भारतीय कृषक समाज राष्ट्रीय अधिवेशन समारंभात होणार आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख जयंती सोहळा व भारतीय कृषक समाज राष्ट्रीय अधिवेशनात कृषी सहकारीता, कृषी रत्न व कृषीभूषण पुरस्कारांचे वितरण होणार आहे. मालवण तालुक्यातील बांदीवडे येथील सागावरील काळी मिरी प्रकल्पाचे प्रणेते मिलिंद प्रभू यांनी कोकण विभागात काळी मिरी लागवड व उत्पादन यशस्वी केल्याची दखल घेऊन त्यांना कृषीभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. २७ रोजी अहमदनगर येथे होणाऱ्या भारतीय कृषक समाज राष्ट्रीय अधिवेशनात मिलिंद प्रभू यांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. या पुरस्काराबद्दल मिलिंद प्रभू यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
