*💫वेंगुर्ला दि.१५-:* बाल संरक्षणासाठी आपला सर्वांचाच पुढाकार महत्त्वाचा आहे. लोक सहभागातून बाल संरक्षण ही एक निरंतर प्रक्रिया आहे. ग्राम बाल संरक्षण समिती गठीत करुन पुढाकार घेण्याची संधी आपल्याला लाभलेली आहे. मुलं ही देशाची संपत्ती असून आपण तिचा सांभाळ करणारे केवळ विश्वस्त आहोत. म्हणूनच मुलांच्या शाश्वत संरक्षणासाठी, त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी ग्राम बाल संरक्षण समितीने जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विश्वनाथ कांबळी यांनी केले. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष सिधुदुर्ग यांच्या मार्फत वेंगुर्ला तालुक्यातील अंगणवाडी सेविका व पोलिस पाटील यांचे तालुकास्तरीय ग्राम बाल संरक्षण समिती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन येथील साई मंगल कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी प्रा.डॉ.आनंद बांदेकर, एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयाच्या मुख्यसेविका मेस्त्री, संरक्षण अधिकारी संस्थापक उदय मालवणकर, नंदकिशोर फोंडेकर, सामाजिक कार्यकर्ता सविता कांबळी आदी उपस्थित होते. बालकांचे हक्क व अधिकार यांचे महत्त्व पटवून देताना सदर हक्काच्या संरक्षणासाठी गाव पातळीवर सुरक्षित व पोषक वातावरण निर्मिती करणे व यासाठी ग्राम बाल संरक्षण समितीने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे विश्वनाथ कांबळी यांनी सांगितले. समितीच्या नियमित बैठका घेऊन बालकांच्या समस्या शोधणे व त्यावर उपाययोजना करणे, बालकांच्या हक्कांसाठी समाजात जनजागृतीबाबत मार्गदर्शन केले. नंदकिशोर फोंडेकर यांनी बालन्याय, बालकामगार कायद्याबाबत तर सविता कांबळी यांनी बालकांचे लैंगिक छळापासून संरक्षण, बालविवाह प्रतिबंधक अधिनियमाबाबत माहिती दिली.
बाल विकासासाठी जबाबदारीने काम करणे आवश्यक-: विश्वनाथ कांबळी…
