दिव्यांग बांधवांची उचलली आर्थिक जबाबदारी..
⚡कणकवली ता.०३-: शासकीय मदतीवर अवलंबून न राहता कासार्डे ग्रामपंचायतीने एक वेगळी संकल्पना राबवत असताना आजच्या दिव्यांग दिनानिमित्त 40 दिव्यांग बांधवांचा सन्मान केला. त्याचप्रमाणे या दिव्यांग बांधवांना लागणारे सहकार्य गावातील दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून उभे करण्याचा संकल्प केला आहे. शासकीय मदतीची वाट न पाहता कासार्डे ग्रामपंचायतीने दिव्यांग बांधवांची स्वीकारलेली जबाबदारी आदर्शवत असल्याचे प्रतिपादन रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक प्रमुख भाजपा नेते ,माजी आमदार प्रमोद जठार यांनी केले.
पं. स. कणकवली व ग्रा. पं. कासार्डे, ता. कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन संपन्न झाला. यावेळी भाजपा नेते प्रमोद जठार यावेळी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्यांग जनांना आधार देत त्यांच्या सामाजिक स्थितीमध्ये परिवर्तन घडवून आणण्यास सुरुवात केली. आज कौतुक आणि अभिनंदनाची गोष्ट अशी, की ग्रा. पं. कासार्डेच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थांनी दिव्यांग जनांना स्वखर्चाने अपेक्षित सहकार्य करण्याचा निर्धार करून एक आदर्श प्रस्थापित केला आहे. त्यामुळे एक भूमिपुत्र म्हणून मला अभिमान आहेच परंतू एका राजकीय पक्षाचा प्रतिनिधी म्हणून असा प्रयत्न करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या ग्रा. पं. सदस्य व अन्य मान्यवर मंडळींचे मी मनापासून अभिनंदन करतो. असे प्रमोद जठार म्हणाले. गावातील दानशूर आणि सधन लोकांनी आपल्या उत्पन्नातील काही भाग दिव्यांग बांधवांसाठी देण्याचे मान्य केले असून ही खरोखर कौतुकास्पद बाब असल्याचे प्रमोद जठार म्हणाले.
