Headlines

आचरा समुद्रात मृत्यूवर धाडसाची मात ; बुडणाऱ्या पर्यटकाला मरीन होमगार्ड्सनी वाचवले

मालवण (प्रतिनिधी)

आचरा समुद्रात समुद्रस्नानाचा आनंद लुटत असताना समुद्राच्या भरतीचा जोर आणि उसळत्या लाटांचा जोर लक्षात न आल्याने मुंबई येथील पर्यटक समुद्रात ओढला जाऊन बुडत असताना या संकट समयी आचरा समुद्र किनारी तैनात असलेल्या दोन मरीन होमगार्डने क्षणाचाही विलंब न लावता थेट समुद्रात धाव घेत बुडणाऱ्या पर्यटकाला वाचविल्याची थरारक घटना आज आचरा समुद्रात घडली. मरीन होमगार्ड नितेश विजय गुरव आणि अनिकेत सुभाष परब यांनी प्रसंगावधान राखत केलेल्या धाडसामुळे मुंबईतील मोहम्मद खान या २५ वर्षीय पर्यटकाला जीवदान मिळाले आहे. यामुळे मोठा अनर्थ टळला असून दोन्ही मरीन होमगार्ड्सनी दाखविलेल्या या शौर्याचे सर्वांकडून कौतुक होत आहे.

मुंबई येथून आचरा येथील नातेवाइकांकडे आलेले एक कुटुंब मंगळवारी सकाळी आचरा समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेले होते. यावेळी कुटुंबातील मोहम्मद खान हे समुद्रस्नानाचा आनंद घेण्यासाठी समुद्रात उतरले. मात्र, भरतीची वेळ असल्याने समुद्राच्या पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने मोहम्मद खान हे समुद्रात ओढले जाऊन बुडू लागले. अचानक उद्भवलेल्या या संकटामुळे त्यांच्या कुटुंबियांमध्ये घबराट पसरली. खान यांना वाचविण्यासाठी नातेवाइकांनी आरडाओरड सुरू केली.

मरीन होमगार्ड्सची समयसूचकता

यावेळी आचरा समुद्रकिनाऱ्यावर तैनात असलेले मरीन होमगार्ड नितेश विजय गुरव आणि अनिकेत सुभाष परब यांच्या कानावर मदतीसाठी सुरू असलेला आक्रोश पडताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता समुद्राच्या दिशेने धाव घेतली. पर्यटक बुडत असल्याचे पाहून दोघांनीही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समुद्रात स्वतःला झोकून दिले. भरतीचा जोर आणि उसळणाऱ्या लाटांचा धोका असतानाही त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू करत खान यांच्या पर्यंत पोहचण्यात यश मिळवीत अथक प्रयत्नांनंतर खान यांना सुरक्षितपणे समुद्राबाहेर काढले.
दोन्ही होमगार्ड्सनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे पर्यटकाला वेळीच मदत मिळाली आणि संभाव्य दुर्घटना टळली.

पोलीस व ग्रामस्थांची घटनास्थळी धाव

या घटनेची माहिती मिळताच आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातिवले यांच्यासह माजी सरपंच राजन गावकर, ग्रामपंचायत सदस्य चावल मुजावर,पोलीस पाटील तन्वी जोशी, जगन्नाथ जोशी,अजय कोयंडे, तुकाराम पडवळ, मीनाक्षी देसाई, हेमंत पेडणेकर, विशाल वैजलं, दिगंबर घाडीगावकर, मनोज पुजारे, सावंत तसेच ग्रामस्थ राजन गावंकर व इतरांनी घटनास्थळी धाव घेत पर्यटक कुटुंबाला धीर दिला.

होमगार्ड्सच्या कामगिरीचे कौतुक

पर्यटक समुद्रात बुडत असताना या संकटाच्या क्षणी मरीन होमगार्ड नितेश गुरव आणि अनिकेत परब यांनी आपल्या कर्तव्याला सर्वोच्च प्राधान्य देत दाखविलेल्या तत्परतेमुळे व धाडसामुळे पर्यटकाचे प्राण वाचले. याबद्दल पर्यटक कुटुंबाने होमगार्ड्सचे आभार मानले. पोलीस व ग्रामस्थांनीही होमगार्ड्सच्या या कर्तव्यनिष्ठतेचे कौतुक केले. त्यांच्या या धाडसी कामगिरीचे आचरा परिसरातून कौतुक होत आहे.

पर्यटकांनी समुद्रात उतरताना खबरदारी घ्यावी

समुद्रकिनाऱ्यावर विशेषतः भरतीच्या वेळी पाण्याचा प्रवाह आणि लाटांची तीव्रता यांचा अंदाज बांधणे कठीण असते. त्यामुळे पर्यटकांनी समुद्रात उतरताना आवश्यक खबरदारी घ्यावी. सुरक्षेसाठी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातिवले यांनी केले.

You cannot copy content of this page