Headlines

प्रत्येक समुद्रकिनाऱ्यावर ऑक्सिजन, लाइफ बोट उपलब्ध करा!

मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांची मागणी;पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सक्षम यंत्रणा उभारण्याचे आवाहन

⚡मालवण ता.१३-:
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात. प्रत्येक समुद्रकिनाऱ्यावर प्रशिक्षित जीवरक्षक, लाइफ सेव्हिंग किट्स, ऑक्सिजन सुविधा आणि आपत्कालीन बचावासाठी लाइफ बोट उपलब्ध करावी, अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी केली आहे.

देवबाग, तारकर्ली, दांडी, चिवला आणि आचरा या समुद्र किनाऱ्यांना भेट देऊन तेथील सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी त्यांनी व्हिडिओ आणि बातम्यांच्या माध्यमातून आमदारांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची वाढती वर्दळ लक्षात घेता आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सक्षम यंत्रणा असणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
विशेषतः देवबाग आणि तारकर्ली समुद्रकिनाऱ्यांवर ऑक्सिजनची सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. समुद्रात बुडण्याची दुर्घटना घडल्यास संबंधित पर्यटकाला उपचारासाठी मालवण येथे आणेपर्यंत बराच वेळ लागतो. या विलंबामुळे पर्यटकाची प्रकृती गंभीर होण्याचा धोका असतो. त्यामुळे दुर्घटनास्थळीच तातडीने प्राथमिक उपचार आणि ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध झाल्यास वेळेवर मदत मिळू शकते, असे त्यांनी नमूद केले.
पर्यटकांच्या जीविताशी संबंधित या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे. प्रत्येक समुद्रकिनाऱ्यावर प्रशिक्षित जीवरक्षकांची नियुक्ती करून आवश्यक बचाव साहित्य, ऑक्सिजन आणि लाइफ बोट उपलब्ध कराव्यात. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी ठाम मागणी गॅरी अन्ननसिएशन यांनी केली आहे.

You cannot copy content of this page