हरी खोबरेकर:मच्छिमार व परवानाधारक जलक्रीडा व्यवसायिकांना सानुग्रह अनुदान देण्यात यावे..
मालवण (प्रतिनिधी)
छत्रपती शिवाजी महाराज यांनी सिंधुदुर्ग किल्ला उभारताना ज्या ठिकाणी किल्ल्याची पायाभरणी केली त्या मोरयाचा धोंडा या ऐतिहासिक स्थळाच्या विकासासाठी स्थानिक शिवप्रेमी तसेच आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे या स्थळाला एक एकर शासकीय जमीन मिळून शासकीय पूजेचाही मान मिळाला. मोरयाचा धोंडा या स्थळाचा विकास होत असताना तो स्थानिक ग्रामस्थाना विश्वासात घेऊन व्हावा, तसेच नौदल दिन कार्यक्रम व पंतप्रधान यांचे आम्ही स्वागतच करतो, मात्र त्या पार्श्वभूमीवर मालवणात होणारे सुशोभीकरण व विकासकामे शाश्वत पद्धतीने व्हावीत, असे शिवसेना ठाकरे गटाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
शिवसेना ठाकरे गटाच्या मालवण येथील शाखेत आयोजित पत्रकार परिषदेत तालुकाप्रमुख हरी खोबरेकर हे बोलत होते. यावेळी शहरप्रमुख बाबी जोगी, माजी नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, महेश जावकर, मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, गणेश कुडाळकर, निनाक्षी मेतर, उमेश मांजरेकर आदी व इतर उपस्थित होते.
यावेळी हरी खोबरेकर म्हणाले, मोरयाचा धोंडा हे सर्वांच्या श्रद्धेचे स्थान आहे. या स्थळाचा विकास होण्यासाठी, याठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी दत्ता नेरकर, गुरु राणे, प्रदीप वेंगुर्लेकर यासारख्या अन्य मंडळींनी आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यातूनच या स्थळाला शासकीय जागा मिळून शासकीय पूजेचाही मान मिळाला. याठिकाणी तपस्वी मयेकर, सन्मेष परब यांच्या पाठपुराव्यातून रांज नाल्याचे काम 1झाल्याने मोरयाचा धोंडा परिसरात येणारे पाणीही अडले आहे. या स्थळाचा विकास होतानां स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन वादळ, पाऊस, समुद्राची भरती ओहोटी यांचा विचार करून त्याप्रमाणे बांधकाम व्हावे, असे हरी खोबरेकर म्हणाले.
आमदार नाईक यांच्या प्रयत्नातून सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिराच्या कामासाठी दीड कोटी निधी मंजूर होऊन हे काम आता पूर्णत्वास येत आहे. किल्ल्यात भूमिगत पाईपलाईनद्वारे काम आमदार नाईक यांनी मंजूर करून घेऊनही आताच्या राज्य सरकारने या कामास स्थगिती दिल्याने हे काम अपूर्ण आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावर लेझर लाईट शो होणे आवश्यक आहे. किल्ल्यातील स्वच्छतेसाठी जिल्हा नियोजन मधून वार्षिक १५ लाखाचा निधी मंजूर व्हावा अशी मागणी आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे, असेही हरी खोबरेकर म्हणाले. पद्मगड, ढोपर कोपर या ऐतिहासिक स्थळांचा विकासही झाला पाहिजे, असेही खोबरेकर म्हणाले.
नौदल दिनाच्या कार्यक्रमासाठी मासेमारी बंद राहणार आहे, तसेच समुद्रातील जलक्रीडा बंद ठेवण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. यामुळे मच्छिमार व पर्यटन व्यवसायिकांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे या मच्छिमार व परवानाधारक जलक्रीडा व्यवसायिकांना सानुग्रह अनुदान देण्यात यावे, अशी आमची मागणी आहे, असेही हरी खोबरेकर म्हणाले.
