मालवण नगरपालिकेतील रचना सहाय्यक पद रिक्त

दीपक पाटकर: केंद्रीय मंत्री नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे भरण्याची केली मागणी…

⚡मालवण ता.२२-: मालवण नगरपालिकेतील रचना सहाय्यक हे पद रिक्त आहे. त्यामुळे कामकाजावर परिणाम झाला असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रचना सहाय्यक हे पद तात्काळ भरावे. हे पद भरेपर्यंत पर्यायी कर्मचारी उपलब्ध करून द्यावा जेणेकरून येथील नागरिकांची विहीत मुदतीत कामे करणे सुलभ होईल, अशा मागणीचे निवेदन मालवणचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना दिले आहे.

मालवण नगरपालिकेतील नगररचना विभागामधील रचना सहाय्यक नीलेश घाडगे यांची २८ एप्रिल रोजी बदली झाल्यानंतर अतिरिक्त कार्यभार रचना सहाय्यक विद्यासागर अतिग्रे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. परंतु, अतिग्रे यांची ऑक्टोबरमध्ये तात्काळ बदली झाल्याने नगरपालिकेतील रचना सहाय्यक हे पद रिक्त आहे. त्यामुळे दैनंदिन कार्यालयीन कामकाज हाताळताना इतर विभागांमधील कर्मचाऱ्यांच्या तसेच नागरिकांच्या कामात अडचणी येत आहेत. नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नगरपालिका हद्दीतील नवीन इमारत बांधकामांना परवानगी देणे, भोगाधिकार प्रमाणपत्र, पाटकर नाहरकत व्यवसाय दाखला, माहितीच्या अधिकारामधील विहीत मुदतीत माहिती देणे, झोन व भाग नकाशा, नकाशा वाचन करणे, प्रधानमंत्री आवास योजनेखालील प्रलंबित प्रकरणे या सारख्या खासगी व शासकीय कामकाजावर विहीत मुदतीत कार्यवाही केली जात नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे, असे पाटकर यांनी म्हटले आहे. आपल्या स्तरावरून नगरपालिका नगररचना विभागा (मंत्रालय) ला योग्य सूचना देऊन रचना सहाय्यक हे तात्काळ पद भरून मिळावे. हे पद भरेपर्यंत पर्यायी कर्मचारी उपलब्ध करून द्यावा जेणेकरून नागरिकांची विहीत मुदतीत कामे करणे सुलभ होईल, असे निवेदन दीपक पाटकर यांनी मंत्र्यांना दिले आहे.

You cannot copy content of this page