⚡बांदा ता.१६-: बांदा येथील रावसाहेब गोगटे-वाळके महाविद्यालयाचे हिंदी व क्रीडा विभाग प्रमुख प्रा. शरद बाबणी शिरोडकर यांना मुंबई विद्यापीठाकडून पीएचडी पदवी प्राप्त झाली आहे. त्यांनी ‘शैलेश माटियानी और राजन गवस के कथा साहित्य का तुलनात्मक अध्ययन’ या विषयावर शोधप्रबंध सादर केला होता. या संशोधनास शोध निर्देशक म्हणून डॉ. विद्या शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
प्रा. शरद शिरोडकर हे सावंतवाडी तालुक्यातील मळगाव गावचे सुपुत्र असून गावात पीएडी पदवी प्राप्त करण्याचा पहिला मान त्यांनी मिळवला असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
प्रा. शरद शिरोडकर यांनी सादर केलेल्या शोध प्रबंधात हिंदी साहित्यातील उत्तराखंड आल्मेडा येथील सुप्रसिद्ध साहित्यीक शैलेश माटियानी यांचे कथा साहित्य व मराठीतील सुप्रसिद्ध साहित्यीक राजन गवस यांच्या कथा साहित्यावरील तुलनात्मक अध्ययन या विषयावर प्रबंध सादर केला होता.
शैलेश माटियानी आधुनिक हिन्दी साहित्य विश्वातील प्रसिद्ध साहित्यीक होते. त्यांच्या ‘बोरीवली से बोरीबन्दर’ तसेच ‘मुठभेड़’, अशा कादंबऱ्या तर चील, अर्धांगिनी अशा कथा सुप्रसिद्ध आहेत. त्यांच्या याच ‘बोरीवली से बोरीबन्दर’ या कादंबरीवर प्रा. शिरोडकर यांनी प्रबंध सादर केला आहे. या कादंबरीत मुंबईतील फुटपाथचं जीवन तसेच शोषित, पीडीत समाजाच्या तसेच कामाठीपूरा सारख्या वस्तीतील जीवन प्रवास मांडण्यात आला आहे.
तर डॉ. राजन गवस हे कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लज तालुक्यातील अत्याळ या गावातील असून ते मराठीतील नामवंत लेखक आहेत. कविता, कथा, कादंबरी, समीक्षा, ललितगद्य असे साहित्य त्यांनी लिहीले आहे. अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, जातीयता, देवदासी, दारिद्र्य ह्या सामाजिक प्रश्नांकडे राजन गवस ह्यांच्या लिखाणाचा ओढा दिसतो. गवसांनी लिहिलेल्या ‘चौंडकं’ आणि ‘भंडारभोग’ या दोन कादंबऱ्या अनुक्रमे देवदासींच्या व जोगत्यांच्या आयुष्यावर बेतलेल्या आहेत. याच दोन्ही लेखकांच्या कथा साहित्यवरील तुलनात्मक अभ्यास (अध्ययन) या विषयावर प्रा. शिरोडकर यांचा प्रबंध आहे.
सुरुवातीला १९९५ साली कणकवली कॉलेजमध्ये क्रीडा संचालक तर त्यानंतर संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे २ वर्षे व फोंडाघाट महाविद्यालयात १ वर्ष क्रिडा संचालक म्हणून काम केले. त्यानंतर ते बांदा येथील रावसाहेब गोगटे – वाळके महाविद्यालयात रुजू झाले. याच दरम्यान त्यांनी मदुराई कामराज युनिव्हर्सीटीतून एम फील मिळविली.
गोगटे वाळके कॉलेजचे म्हणजेच शिक्षण प्रसारक मंडळ बांदा संस्थेचे प्रेसिडंट तथा जागतिक आरोग्य संघटनेचे माजी सल्लागार कै. डॉ. बी.बी. गायतोंडे यांचे त्यांना मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्याच प्रेरणेतून त्यांनी पीएचडी मिळवायचा निश्चय केला. यात त्यांना माजी चेअरमन उमेश फातरफोड, विद्यमान अध्यक्ष डी. बी. वारंग, प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर, टी. एन. शेटकर, एस. आर. सावंत, कै. सुभाष मोर्ये, सतीश येडवे, धोंडू पणशीकर यांचे मार्गदर्शन लाभले.
