स्वराज्य प्रतिष्ठान व रोट्रॅक्ट क्लब ऑफ रायझिंग स्टारं युथ बांदा तर्फे आयोजन
⚡बांदा ता.०७-: येथील श्री स्वराज्य प्रतिष्ठान व रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा यांच्या वतीने दिवाळी निमित्त स्वराज्याचे स्थापत्य अभियंता हिरोजी इंदुलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दोन गटात बांदा शहर मर्यादित किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १४ वर्षाखालील व खुल्या गटात होणार आहे.
मोठ्या गटातील प्रथम पारितोषिक कै. सचिन नाटेकर यांच्या स्मरणार्थ श्री निलेश नाटेकर यांनी पुरस्कृत केले आहे. तसेच द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक कै. सचिन नाटेकर यांच्या स्मरणार्थ बांदा रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रमोद कामत यांनी पुरस्कृत केले आहे.
सर्व स्पर्धकांना ई-सर्टिफिकेट रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा तर्फे देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी ‘कोणत्याही किल्ल्याची प्रतिकृती’ हा विषय ठेवण्यात आला आहे. मोठ्या गटातील प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे ३०००, २०००, १००० रुपये रोख, व स्वराज्याचे स्थापत्य अभियंता हिरोजी इंदुलकर स्मृती सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. लहान गटातील विजेत्यांना अनुक्रमे २०००, १५००, ७०० रुपये रोख व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. स्पर्धकांनी संकेत वेंगुर्लेकर (मो. ९०१११०७५६२) यांच्याकडे १० नोव्हेंबर पर्यंत नावनोंदणी करावी. स्पर्धेचे परीक्षण पाचव्या व सहाव्या दिवशी करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन श्री स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश मोरजकर, रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथचे अध्यक्ष अक्षय मयेकर यांनी केले आहे.
