⚡मालवण ता.०७-: प्रशासनाने मालवण किनारपट्टीवरील ६७ अनधिकृत आणि अतिक्रमण बांधकामे तोडून टाकण्याची संबंधितांना सात दिवसाची मुदत दिल्यानंतर ही मुदत संपूनही त्यांच्यावर कारवाई न झाल्याने आपण प्रशासनाच्या विरोधात समुद्रात बसून उपोषण छेडले आहे. बंदर विभागाने आकसापोटी, सूडबुद्धीने माझ्यावर कारवाई केल्याचा आरोप दामोदर तोडणकर यांनी करीत श्री. तोडणकर यांनी आज सकाळ पासून मालवणच्या समुद्रात उपोषण सुरु केले.
मालवण बंदर जेटी येथील परिसरातील श्री. दामोदर तोडणकर यांचे निवास स्वरूपातील बांधकाम अतिक्रमण असल्याचे सांगत प्रादेशिक बंदर अधिकारी महाराष्ट्र सागरी मंडळ सिंधुदुर्ग ओरोस यांनी हे बांधकाम स्वतःहून हटवावे अन्यथा प्रशासनाकडून बांधकाम हटविण्याची कारवाई केली जाईल अशा आशयाची नोटीस बजावली होती. मात्र नोटीस बजावूनही श्री. तोडणकर यांनी बांधकाम न हटविल्याने आठ दिवसापूर्वी श्री. तोडणकर यांचे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले होते. तर याठिकाणी असलेली झाडेही तोडण्यात आली होती.
श्री तोडणकर यांचे हे बांधकाम हटवित असताना किनारपट्टीवरील अन्य ६७ बांधकाम धारकांची यादी समोर आली होती. त्यांनाही अनधिकृत व अतिक्रमण बांधकाम तोडण्याबाबत ७ दिवस मुदतीच्या नोटीसा प्रशासनाने बजावण्यात आल्या होत्या. नोटीस कालावधी संपल्यावर अन्य बांधकामे बंदर विभाग अथवा प्रशासन यंत्रणेने हटविण्याची कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र याची कार्यवाही न झाल्यानेच आपण प्रशासनाच्या विरोधात समुद्रात बसून उपोषण छेडले आहे. बंदर विभागाने आकसापोटी, सूडबुद्धीने माझ्यावर कारवाई केली आहे. एका बंदर अधिकाऱ्याने पैशाची मागणी केली. त्याला पैसे न दिल्याने बांधकाम हटविण्याची कारवाई करण्यात आल्याचा आरोप तोडणकर यांनी केला असून नोटीसा बजावण्यात आलेली बांधकामे न पाडल्याने तसेच बंदर जेटी समोरील झाडे जमीनदोस्त करण्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांवर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. याबाबत कारवाई करण्यात यावी अशी आपली मागणी आहे. आंदोलनाची पुढील दिशा मालवण बंदर विभाग अथवा तहसीलदार कार्यालयासमोर कुटुंबासमवेत आत्मदहन करणार असल्याचे श्री. तोडणकर यांनी स्पष्ट करत या सर्वाला प्रशासनच जबाबदार असेल असेही त्यांनी सांगितले.
