पोलिसांची घटनास्थळी धाव:हल्ल्यात पर्ससीन नौकवरील सुमारे १५ खलाशी जखमी…
मालवण दि प्रतिनिधी
मालवण तळाशीलच्या समुद्रात खडक कवडा या रॉक जवळ पर्ससीन मच्छिमार आणि पारंपरिक मच्छिमार यांच्यात तुंबळ धुमश्चक्री झाल्याने या हल्ल्यात पर्ससीन नौकवरील सुमारे १५ खलाशी जखमी झाले असून त्यातील तिघाजणांना मालवणच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार
आज तळाशीलच्या समुद्रात पर्ससीन मच्छिमार आणि पारंपारिक मच्छिमार यांच्यात संघर्ष पेटला आणि त्याचे पर्यावसान भर समुद्रात तुंबळ धुमश्चक्री होण्यात झाली.
आज सायंकाळी तळाशील समोरील समुद्रात सर्जेकोट येथील कृष्णनाथ तांडेल यांची चिन्मय प्रसाद व प्रथमेश सीताराम लाड यांची पीर सुलेमान या पर्ससीन नौका मासेमारी करीत होत्या. यावेळी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास काही स्थानिक पारंपारिक मच्छिमारांनी सुमारे ८ ते १० नौकांद्वारे या पर्ससीन नौकांना गाठत त्यांच्यावर हल्ला चढवीला. यावेळी पारंपारिक मच्छिमार व तांडेल यांच्या नौकेवरील नेपाळी खलाशी यांच्यात तुंबळ हाणामारी होऊन पारंपारिक मच्छिमारांनी दांडे व काठ्यांनी खलाशाना मारहाण केल्याची चर्चा आहे . यामध्ये सुमारे दहा खलाशी जखमी झाल्याचे वृत्त असून प्रथमेश लाड यांच्या नौकेवरही मच्छिमारांनी चढविलेल्या हल्ल्यात हाणामारी होऊन ५ तें ६ खलाशी जखमी झाल्याचे समजते यातील तीन खलाशाना रात्री मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. याबाबतची माहिती मिळताच मालवण पोलिसांनी रुग्णालयात धाव घेत माहिती घेतली. त्यानंतर मालवण पोलीस स्थानकात याबाबत जबाब व गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.
