केंद्रीयमंत्री राणे यांची उपस्थिती:सहभागी होण्याचे भाजप जिल्हाध्यक्ष सावंत यांचे आवाहन
ओरोस ता १
जिल्ह्यातील बारा बलुतेदार यांच्यासाठी ‘विश्वकर्मा कौशल सन्मान योजना’ मेळावा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत 5 ऑक्टोंबर 2023 रोजी दुपारी 3 वाजता सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली.
यावेळी आ. नितेश राणे, प्रदेश सचिव निलेश राणे, माजी आ राजन तेली, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी समाजातील सर्व स्तरातील लोकप्रतिनिधींसह सर्व समाजातील लोकानी मोठ्या संख्येने सहभागी राहत योजने बाबत करण्यात येणाऱ्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे .
या योजनेचा लाभ घेण्यासाठी देशातील दहा लाख लोकांनी एका आठवड्यात प्रस्ताव सादर केले आहेत. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग सुपुत्र शरद मेस्त्री यांना दिल्ली येथे बोलावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते सन्मानित केले. या माध्यमातून आपल्या जिल्ह्याला देशपटलावर नेण्यात आले आहे. हे निश्चित कौतुकास्पद आहे. जिल्ह्यातील कारागिरांना त्यांच्या कलेला निश्चित असा वाव मिळणे ही या योजनेची उपलब्धी आहे. तसेच या योजनेंतर्गत सुरवातीला रुपये किमान एक लाख रुपये किमान 5 टक्के व्याजाने कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. ही एक सुसंधी आहे. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध जाती -जमातीमधील विश्वकर्मानीं या मेळाव्यास उपस्थित राहून या योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ समजून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
