बांदा : प्रतिनिधी
अंजली गोविंद सावंत यांनी मुंबई विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील एम.एस्सी. पदवी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. एप्रिल २०२५ मध्ये झालेल्या एम.एस्सी. पदवी परीक्षेत कार्बनी रसायनशास्त्र (ऑरगॅनिक केमिस्ट्री) विषयात त्यांनी प्रथम क्रमांक मिळविला. तसेच, या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांमध्ये सर्वाधिक एकूण गुण मिळवत संपूर्ण रसायनशास्त्र विभागातून प्रथम क्रमांक पटकावला.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अंजली सावंत यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. त्यांनी एम.एस्सी. पदवीमध्ये ९.६ संचयी श्रेणी बिंदू सरासरी (सीजीपीए) मिळविली आहे. त्यांच्या या यशामुळे त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची नोंद झाली आहे.
आई व मार्गदर्शकांचे मोलाचे योगदान
अंजली यांच्या या यशामागे त्यांच्या आई श्रीमती गौरी गोविंद सावंत यांचा मोलाचा वाटा आहे. शैक्षणिक प्रवासात त्यांनी सातत्याने प्रोत्साहन, आधार आणि आत्मविश्वास देत अंजली यांना पुढे जाण्यास प्रेरणा दिली.
तसेच, मुंबई विद्यापीठातील कार्बनी रसायनशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ. रामचंद्र थोरात यांचेही अंजली यांच्या यशात महत्त्वाचे योगदान आहे. त्यांनी शैक्षणिक तसेच इतर बाबींमध्ये सातत्याने मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि सहकार्य केले.
आपल्या या यशाचे आणि मिळालेल्या सुवर्णपदकाचे श्रेय अंजली सावंत यांनी आई श्रीमती गौरी गोविंद सावंत आणि मार्गदर्शक डॉ. रामचंद्र थोरात सर यांना दिले आहे. त्यांच्या या यशाबद्दल परिसरातून अभिनंदन होत आहे.

