जिल्हा पोलिस अधीक्षक अग्रवाल यांचा उपक्रम:जेष्ठ नागरिक, सफाई कामगार यांचाही केला सत्कार
ओरोस ता.०१-:
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलामार्फत जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय परिसरात श्रमदानातून स्वच्छता मोहीम आज राबविण्यात आली. तसेच सिंधुदुर्ग पोलीस दलातील सफाई कर्मचारी तसेच जेष्ठ नागरीक दिनानिमित्त जेष्ठ नागरीकांचा करण्यात आला सत्कार.
सप्टेंबर 2023 च्या मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ ऑक्टोबर 2023 रोजी एक तास स्वच्छतेसाठी श्रमदान करण्याचे आवाहन केलेले होते. यावेळी त्यांनी 1 ऑक्टोबर रोजी एक तास, एक साथ असा एक नारा दिला होता. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वच्छता पंधरावडा स्वच्छता ही सेवा या अभियांनातर्गत राज्यभर स्वच्छता मोहीत राबविण्याचे आवाहन केलेले होते. त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांचे संकल्पनेतून सिंधुदुर्गनगरी येथील सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस मुख्यालय येथील पोलीस अधिकारी व अंमलदार निवासस्थानाचे आवारात स्वच्छतेतून श्रमदान ही मोहीम राबविण्यात आली.
ही मोहीम राबविण्यासाठी पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांचेसह विशेष अतिथी सरकारी अभियोक्ता संदीप राणे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, उपाध्यक्ष बाळ खडपकर यांचे सहपोलीस सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातील 15 अधिकारी, 106 पोलीस अंमलदार, 106 सफाई कामगार सहभागी झालेले होते. स्वच्छतेसाठी श्रमदान ही मोहीम सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत राबविण्यात आली.
या कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर पोलीस अधीक्षक अग्रवाल, जिल्हा सरकारी अभियोक्ता राणे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष तोरसकर, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष खडपकर यांचेतर्फे सिंधुदुर्ग जिल्हयातील सफाई कर्मचारी बाळकृष्ण किंजवडेकर, श्रीमती प्रतिभा माळी, प्रविण गुरव, स्वप्नील पुजारे, श्रीमती हर्षदा कदम तसेच मोची कर्मचारी युवराज कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.
