कुडाळ : तालुक्यात गुरुवारी मोठ्या उत्साहात व भावपूर्ण वातावरणात अकरा दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला, मोरया मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, अशा घोषणांचा निनाद करीत आणि फटाक्याची आतषबाजी करीत वाजत- गाजत गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला.यावर्षी अनंत चतुर्दशी २५ सप्टेंबर रोजी असली तरी बहुतेक गणेश भक्तांनी सालाबाद अकरा दिवसांनी गणेश विसर्जनाला पसंती दिल्याचे पाहायला मिळाले.
गणेश उत्सव हा कोकणवासीयांचा उत्साहाचा सण आहे. तालुक्यात दीड, पाच, सात व अकरा दिवस गणेश मूर्तीचे पूजन केले जाते. मोठ्या संख्येने मुंबई, पुणे, गोवा आदी राज्यातून चाकरमानी दाखल होतात. या कालावधीत आरती, भजने आदी कार्यक्रमांची मोठी रेलचेल सुरु असते. बच्चे कंपनीचा उत्साह मोठ्या संख्येने पहायला मिळाला.
कुडाळ शहरात संध्याकाळपासूनच गणपती बाप्पांच्या विसर्जनाला सुरुवात झाली होती. जसजसा अंधार पडत होता तसतशी गणेश घाटांवरची गणेशभक्तांची गर्दी वाढत होती. कुडाळ मध्ये यंदा नगर पंचायतच्या वतीने उभारण्यात आलेल्या नवीन गणेश घाटावर मूर्ती विसर्जनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. नगर पंचायतच्या वतीने सुद्धा विसर्जनासाठी चोख व्यवस्था करण्यात आली होती. विसर्जन तराफा, प्रशिक्षित माणसे, निर्माल्य कलश यामुळे शिस्तबद्ध रीतीने गणेश विसर्जन करण्यात आले. सर्वच ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावर्षी अनंत चतुर्दशी २५ सप्टेंबर रोजी असली तरी बहुतेक गणेश भक्तांनी सालाबाद अकरा दिवसांनी गणेश विसर्जनाला पसंती दिल्याचे पाहायला मिळाले.

