Headlines

मालवणातील बेकायदेशीर वाहतूक, अवैध धंदे, अंमली पदार्थ विरोधात कडक कारवाई होणार

मालवणचा पदभार स्वीकारणाऱ्या डीवायएसपी दीपक शेलार यांचा इशारा

मालवण (प्रतिनिधी)

परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक शेलार यांनी मालवण पोलीस ठाण्याचा पोलीस निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारताच त्यांनी शहरातील कायदा, सुव्यवस्था आणि आगामी उपक्रमांबाबत पोलीस प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली आहे. शहरातील अवैध धंदे, बेकायदेशीर वाहतूक, नशाबंदी तसेच अंमली पदार्थांचे सेवन व विक्री याबाबत जनजागृती करतानाच कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा शेलार यांनी दिला आहे.

सध्या गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून अकरा दिवसांच्या आणि अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शांतता राखण्याचे आवाहन डीवायएसपी दीपक शेलार यांनी केले आहे. विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि लेझर लाईट्सचा वापर कोणीही करू नये, तसेच सर्व गणेशभक्तांनी शांततेत विसर्जन मिरवणुका काढाव्यात, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

येत्या काळात मालवण पोलीस ठाण्याच्या वतीने विविध मोहिमा राबविल्या जाणार आहेत. यात अवैध धंदे, बेकायदेशीर वाहतूक, नशाबंदी तसेच अंमली पदार्थांचे सेवन व विक्री करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही कडक नजर ठेवली जाणार आहे. जे पालक आपल्या अल्पवयीन मुलांना वाहने चालविण्यास देतात, त्यांचे पहिल्या टप्प्यात समुपदेशन व जनजागृती केली जाईल. मात्र, त्यानंतरही सुधारणा न झाल्यास संबंधित पालकांवर मोठी दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

शहरात कुठेही अवैध धंदे किंवा नियमबाह्य वाहतूक सुरू असल्यास नागरिकांनी तत्काळ मालवण पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती द्यावी. माहिती देणाऱ्या नागरिकांची नावे पूर्णपणे गुप्त ठेवली जातील, असे आश्वासन दीपक शेलार यांनी दिले आहे.

पोलीस हे जनतेचे सेवक आहेत. मालवण शहर स्वच्छ, निरोगी आणि नशामुक्त ठेवणे हे आमचे ध्येय आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी व अंमलदार कर्तव्य बजावतील. मालवणमध्ये चांगले आणि सुरक्षित पर्यटनाचे वातावरण निर्माण करून शहराच्या विकासाला हातभार लावण्याचे आमचे नियोजन आहे,” असे दीपक शेलार यांनी स्पष्ट केले. पोलीस प्रशासन जनतेच्या सेवेसाठी पूर्णपणे कटिबद्ध असून या सर्व मोहिमांमध्ये मालवणच्या सुजाण नागरिकांचे उत्तम सहकार्य लाभेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

You cannot copy content of this page