तालुका खरेदी विक्री संघाच्या वार्षिक बैठकीत चेअरमन राजन गावकर यांची माहिती:सभासदांनी किमान वेतन देण्याचा उपस्थित केला प्रश्न..
⚡मालवण ता.३०-: मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या मागील सभेत कर्मचाऱ्यांना किमान वेतनाचा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यांना किमान वेतन लागू झाले का ? न झाल्यास ते केव्हा सुरु होणार असा प्रश्न खरेदी विक्री संघाचे सभासद नंदू देसाई, राजन भोजणे, संतोष लुडबे यांनी उपास्थित केल्यानंतर चेअरमन राजन गावकर यांनी कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्याबाबत संचालक मंडळात विचारविनिमय सुरु असून कर्मचाऱ्यांना नाराज करणार नाही. संस्थेचा फायदा तोटा पाहून कर्मचाऱ्यांना योग्य तो न्याय देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली
मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची वार्षिक सभा चेअरमन राजन गावकर यांच्या अध्यक्षतेखाली दैवेज्ञ भवन येथे पार पडली. यावेळी व्हा. चेअरमन कृष्णा ढोलम, संचालक महेश मांजरेकर, के. पी चव्हाण, अशोक तोडणकर, विजय ढोलम, प्रफुल्ल प्रभू, महेश गावकर, अमित गावडे, रमेश हडकर, सुरेश चौकेकर, अभय प्रभुदेसाई, राजेंद्र प्रभुदेसाई, सरोज परब, व्यवस्थापक रघुनाथ चव्हाण, यासह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.
सभेच्या प्रारंभी नवनिर्वाचित संचालकांचा अभिनंदनाचा ठराव अनिल न्हिवेकर यांनी मांडला. चतुर्थी कालावधीत यंदाचे कडधान्य चांगल्या दर्जाचे होते. या काळात जीव तोडून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अभिनंदन ठराव राजन भोजणे यांनी मांडला.
यावेळी कृष्णनाथ तांडेल यांनी सभासद शेअर्स किमान २५० वरून ही एक हजार करण्यात यावी. गेली कित्येक वर्षे हा विषय रेंगाळलेला आहे. त्यामुळे आता तरी हा विषय गांभीर्याने घेऊन सभासद एक हजार करण्यात यावी अशी मागणी केल्यानंतर महेश लुडबे यांनी याला विरोध करत ती २५० रुपयेचं ठेवण्यात यावा, त्यात कोणतीही वाढ करण्यात येऊ नये असे सांगितले. यावेळी बाळू अंधारी यांनी अहवालात अनेक बारीक बारीक चुका आहेत. पुढच्या वेळी या चुका टाळा असे सांगितले. संचालक आणि कर्मचाऱ्यांच्या एकजुटीच्या जोरावर मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची वाटचाल सुरु आहे. भारत गॅस सिंधू बझार, खत गोडावून या प्रकल्पांसह येणाऱ्या काळात उत्त्पन्न वाढीच्या दृष्टीने पर्यटक निवास, मेडिकल, व्यापारी गाळ्यांच्या माध्यमातून व्यापार वृद्धी करण्यात येणार असल्याचे आजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळाने स्पष्ट केले.
यावेळी ज्या सभासदांच्या पाल्यांनी शैक्षणिक क्षेत्रात यश संपादन केले त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तर संस्थेचे आदर्श ग्राहक म्हणून प्रशांत अंकुश मयेकर, रसिका मालवणकर तसेच आदर्श विकास संस्था म्हणून श्री रामेश्वर विकास सेवा सोसायटी चिंदर यांचा सत्कार करण्यात आला. शेवटी महेश मांजरेकर यांनी आभार मानले
