शिवरायांच्या पुतळ्यामुळे राजकोट किल्ला पुनर्जिवीत होईल…

बाबा मोंडकर:जिल्ह्यातील ३८ किल्ल्यातील माती पुतळ्याच्या ठिकाणी आणून विधिवीत पूजन व्हावे यासाठी पर्यटन महासंघ प्रयत्नशील..

⚡मालवण ता.३०-: सिंधुदुर्ग किल्ल्यात होणाऱ्या नौदल दिनानिमित्त नौदला कडून उभारण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा सिंधुदुर्ग किल्ल्यातच उभारावा अशी शिवप्रेमींची मागणी होती व त्यासाठी आम्ही प्रयत्नही केले. मात्र किल्ल्यातील जागा मालक व प्रशासन यांच्याशी योग्य समन्वय झाला नाही. तथापि, पुतळा उभारण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकारातून मुंबईत झालेल्या बैठकीत राजकोट येथील जागा निश्चित होऊन पुतळ्याचा आराखडा तयार करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांनीच उभारलेल्या मात्र आता पूर्णतः पडझड झालेल्या राजकोट किल्ल्यात शिवरायांचा पुतळा उभारल्याने राजकोट किल्ला पुनर्जीवीत होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले.

मालवण येथील हॉटेल ऐश्वर्य येथे आज शिवप्रेमींची बैठक होऊन पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी बाबा मोंडकर हे बोलत होते. यावेळी पर्यटन महासंघाचे मालवण तालुकाध्यक्ष अविनाश सामंत, शहराध्यक्ष मंगेश जावकर, किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष गुरुनाथ राणे, तारकर्ली पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष सहदेव साळगावकर, विदेशी मद्य विक्रेता संघांचे जिल्हाध्यक्ष शेखर गाड, राजकोट येथील पर्यटन व्यावसायिक सहदेव बापर्डेकर, भूषण साटम, सुरेश बापर्डेकर, रवींद्र खानविलकर, दर्शन वेंगुर्लेकर आदी व इतर उपस्थित होते.

यावेळी बाबा मोंडकर म्हणाले, भारतीय सागरी आरामाराचे जनक असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवणच्या सागरात किल्ले सिंधुदुर्गची उभारणी करत किनारपट्टीवर आपले वर्चस्व निर्माण केले. त्यामुळे आमच्यासाठी सिंधुदुर्ग किल्ला हेच शिवरायांचे मोठे स्मारक असून नौदल दिना निमित्त उभारण्यात येणारा शिवरायांचा पुतळा हा सिंधुदुर्ग किल्ल्यातच व्हावा अशी आम्हा शिवप्रेमींची मागणी होती. या मागणीसाठी पर्यटन महासंघ, सिंधुदुर्ग किल्ला प्रेरणोत्सव समिती, तारकर्ली पर्यटन विकास संस्था, मातृत्व आधार फाउंडेशन यांच्या तर्फे आम्ही एकत्रित प्रयत्न केले. नौदलने किल्ल्यात निश्चित केलेली जागा देण्यास सदर जागा मालकाने नकार दिल्याने किल्ल्यात अन्य जागेसाठी तेथील जागा मालक व प्रशासन यांच्याशी चर्चा केली. मात्र जागा मालक व प्रशासन यांच्यात समन्वय होऊ शकला नाही. त्यामुळे जागा निश्चिती बाबत पालकमंत्री यांच्या पुढराकारातून मुंबईत झालेल्या बैठकीत राजकोट येथील जागा निश्चित करण्यात आली. मात्र किल्ला सोडून अन्य जागेत पुतळा उभारताना तो केवळ पुतळा म्हणून न राहता ते एक प्रकारे शिवरायांचे स्मारक होण्याच्या दृष्टीने पुतळ्या सभोवती सिंधुदुर्ग किल्ल्याप्रमाणे तटबंदी सारखी भिंत उभारावी, अशी मागणी आम्ही शिवप्रेमीनी केली.

त्याचा सकारात्मक विचार होऊन नौदलाने पुतळ्याच्या आराखड्यात बदल करून त्यात तटबंदी सारख्या भिंतीचा समावेश केला, असेही मोंडकर म्हणाले.

जिल्ह्यात ३८ गड किल्ले असून त्यातीलच एक राजकोट किल्ला आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या उभारणीवेळी सहाय्यक किल्ला म्हणून शिवरायांनी हा किल्ला उभारला होता. मात्र आज तेथे काहीच अवशेष शिल्लक आहेत. अशा किल्ल्यात शिवरायांचा पुतळा उभारल्यामुळे हा किल्ला पुनर्जीवीत होणार आहे. मात्र हे ठिकाण केवळ पुतळ्या पुरते मर्यादित न राहता ते स्मारक बनावे यासाठी आम्ही काही योजना सदर बैठकीत सुचविल्या आहेत. पुतळ्याच्या भूमिपूजन वेळी जिल्ह्यातील ३८ किल्ल्यातील माती पुतळ्याच्या ठिकाणी आणून विधिवीत पूजन व्हावे यासाठी पर्यटन महासंघ प्रयत्नशील आहे. त्यानुसार पर्यटन ग्राम समित्यांद्वारे ही माती गोळा करण्याचे काम करून भव्य रॅलीने ही माती आणण्यात येईल. तसेच राजकोट येथे सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती देणारे संग्रहालय उभारावे, लाईट अँड साउंड शो निर्माण करावा, आरमार संग्रहालय व गड माहिती केंद्र उभारावे, अशा मागण्या आम्ही केल्या आहेत. तसेच पुतळा उभारणीमुळे राजकोटचे चित्र पालटणार असल्याने पर्यटनाच्या दृष्टीने राजकोट येथील पर्यटन व्यवसायिकांची एक समिती देखील स्थापन करण्यात येणार आहे, असेही यावेळी बाबा मोंडकर यांनी सांगितले.

You cannot copy content of this page