मच्छी मार्केट पटांगणावर रंगणार पाच वाजता स्पर्धेला होणार सुरवात..
बांदा/प्रतिनिधी
भाजप नेते माजी आमदार राजन तेली यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी स्पर्धा ही उद्या शनिवारी (ता. ९) रंगणार असून त्या पार्श्वभूमीवर बांद्यात भाजप कडून जोरदार तयारी सुरू आहे. तब्बल १ लाख ११ हजार १११ रुपयाचे पहिले बक्षीस तर दुसरे बक्षीस ५५ हजार ५५५ रुपये ठेवण्यात आले आहे. ही स्पर्धा बांदा मच्छी मार्केट पटांगण येथे सायंकाळी पाच वाजता होणार आहे.
बांदा मच्छीमार्केट येथील भव्य पटांगणावर भाजपकडून आयोजन केलेल्या दहीहंडी उत्सव करीता भाजपची नियोजन बैठक बांदा येथील श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालयात आज संपन्न झाली. बांदा मच्छी मार्केटच्या भव्य पटांगणावर 9 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता भाजपकडून दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
दहीहंडी फोडणाऱ्या प्रथम क्रमांकाच्या संघाला एक लाख 11 हजार 111 रुपये तर द्वितीय संघाला 55 हजार 555 बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच पाच थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला 5 हजार रुपये सहा थर लावणाऱ्या पथकाला 6 हजार रुपये, सात थर लावणाऱ्या पथकाला 7 हजार रुपये तर आठ थर लावणाऱ्या पथकाला 8 हजार रुपये देण्यात येणार आहेत.
दहीहंडी उत्सवाच्या थराराचे युवा मराठी अभिनेत्री मृण्ययी देशपांडे, युवा पार्श्वगायिका कविता राम, युवा पार्श्वगायक स्वप्निल गोडबोले हे खास आकर्षण आहेत. सूत्रसंचालक म्हणून वृत्त निवेदक ऋषिकेश देसाई उपस्थित राहणार आहे. तसेच यावेळी भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
बांद्यात प्रथमच दहीहंडी उत्सव आयोजन एवढ्या मोठय़ा प्रमाणात करण्यात आले असून यात युवकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली, युवा नेते प्रथमेश तेली यांनी केले आहे. यावेळी बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब, बांदा मंडल उपाध्यक्ष उमेश पेडणेकर, सिद्धेश महाजन, अशोक सावंत, बाळा आकेरकर, गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्वर सावंत, नितेश पेडणेकर, वाफोली सरपंच उमेश शिरोडकर, शैलेश केसरकर, तसेच बांदा शहरातील भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी मच्छिमार्केट मैदानाला भेट देत पाहणी केली व कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात राजन तेली व भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
फोटो :-
बांदा येथे आयोजित करण्यात येणाऱ्या दहीहंडी उत्सवाचे नियोजन करताना माजी आमदार राजन तेली. सोबत उपस्थित पोलीस निरीक्षक शामराव काळे व भाजप पदाधिकारी. (छायाचित्र – निलेश मोरजकर)
