⚡बांदा ता.०९-: मडुरा (ता. सावंतवाडी) येथील प्रगतिशील शेतकरी, बागायतदार व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश वालावलकर यांना पंढरपूर येथील विचार मंथन सोशल फाउंडेशनच्या वतीने ‘राष्ट्रीय कृषी भूषण पुरस्कार २०२६’ देऊन गौरविण्यात आले. पंढरपूर येथील योग भवन हॉलमध्ये झालेल्या राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
शेती व बागायती क्षेत्रातील तब्बल ३६ वर्षांचा अनुभव असलेल्या वालावलकर यांनी सिंधुदुर्गातील पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविला आहे. मडुरा परिसरात केळी, भाजीपाला व अन्य बागायती पिकांच्या माध्यमातून त्यांनी शेती क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रतिकूल हवामान, पाण्याची समस्या, सिंचनाचा अभाव आणि पिकांचे नुकसान अशा विविध अडचणींवर मात करत त्यांनी शेतीची वाटचाल सुरू ठेवली आहे.
वालावलकर यांचा तिलारी प्रकल्पाच्या कालव्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शेतकऱ्यांसोबतचा संघर्षही उल्लेखनीय आहे. २०२३ मध्ये बांदा-ओटवणे-इन्सुली-रोणापाल कालव्यातून पाणी न आल्याने बागायती व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दा त्यांनी शेतकऱ्यांसह प्रशासनाच्या निदर्शनास आणला होता.
तसेच अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे मडुरा परिसरातील केळी बागायतीचे मोठे नुकसान झाल्याचेही यापूर्वी समोर आले होते. वालावलकर यांच्या केळी बागायतीला या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला होता.
‘सिंधुदुर्गच्या शेतीला पाणी, बाजारपेठ आणि तंत्रज्ञानाची गरज’
पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना वालावलकर यांनी सिंधुदुर्गातील शेतीसमोरील आव्हानांकडे लक्ष वेधले. कोकणातील शेतकरी केवळ पावसावर अवलंबून राहिल्यास शेती टिकविणे कठीण होणार असून सिंचनाच्या सुविधा, पाण्याचे योग्य नियोजन, आधुनिक कृषी तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग आणि शेतमालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “शेतकऱ्याने शेती सोडू नये, यासाठी शेतीला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे गरजेचे आहे. सिंधुदुर्गात फळबागायती, भाजीपाला, काजू, आंबा, नारळ, सुपारी यांसारख्या पिकांना मोठी क्षमता आहे. मात्र उत्पादनाबरोबरच प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि थेट बाजारपेठ यावर भर दिला पाहिजे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
हवामानातील बदलामुळे कधी अतिवृष्टी, तर कधी पावसाचा प्रदीर्घ खंड अशी परिस्थिती निर्माण होत आहे. याचा थेट परिणाम भातशेतीसह आंबा, काजू, नारळ व सुपारीच्या बागायतींवर होत आहे. सिंधुदुर्गात यंदाही पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे भातशेती आणि फळबागांवर संकट निर्माण झाले असल्याचे अलीकडील वृत्तांतून स्पष्ट झाले आहे.
शेतकऱ्यांच्या अडचणी केवळ नुकसानभरपाई देऊन संपणार नाहीत. कायमस्वरूपी सिंचन व्यवस्था, पाणीसाठे, हवामानाचा अचूक अंदाज, पीक नियोजन आणि शेतमालाला हमीची बाजारपेठ या बाबींवर शासनाने दीर्घकालीन धोरण आखणे आवश्यक आहे,” असेही वालावलकर यांनी आपल्या भाषणात अधोरेखित केले.
वालावलकर हे शेतीबरोबरच सामाजिक क्षेत्रातही कार्यरत असून जय बजरंगबली मंडळाचे अध्यक्ष, जय हनुमान देवस्थानचे सहसचिव, व्ही. एन. नाबर स्कूल गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य, माजी ग्रामपंचायत सदस्य, श्री देवी माऊली शेतकरी संघाचे पदाधिकारी तसेच सिंधुदुर्ग बागायतदार फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने भूमिका मांडणाऱ्या वालावलकर यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतल्याने मडुरा परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख, उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, पंढरपूर पंचायत समितीचे उपसभापती प्रमोद देशमुख, सुषमा बनसोडे, विमल बनसोडे, प्रतीक वालावलकर, सौ प्राजक्ता वालावलकर आदी उपस्थित होते.
फोटो:-
पंढरपूर येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना प्रकाश वालावलकर व कुटुंबीय. (छायाचित्र- नीलेश मोरजकर)

