मुंबईतील युवा महोत्सवात कामगिरी : महाविद्यालयाच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा..
⚡सावंतवाडी, ता.०९-: सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या लोकनृत्य संघाने मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवात सुवर्णझळाळी मिळवली. ६ ऑक्टोबर रोजी मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागांतर्गत आयोजित अंतिम फेरीत महाविद्यालयाच्या संघाने लोकनृत्य स्पर्धेत ‘समई नृत्य’ सादर करून सुवर्णपदक पटकावले. महाविद्यालयाच्या इतिहासात लोकनृत्य या कलाप्रकारात मुंबई विद्यापीठ स्तरावर प्रथमच सुवर्णपदक मिळविण्याचा मान या संघाने संपादन केला आहे. या यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला असून, कोकणच्या सांस्कृतिक वैभवाची सुवर्णमुद्रा मुंबईच्या कलामंचावर उमटली आहे. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी ‘समई नृत्य’ सादर केले. पारंपरिक लोककलेचा गंध, ताल-लय-ठेक्याचा सुरेख मिलाफ आणि नृत्याविष्कारातील कमालीचा समन्वय यामुळे या सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षक तसेच परीक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळवली. कोकणातील ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांनी मुंबईसारख्या मोठ्या व्यासपीठावर केलेली ही कामगिरी त्यांच्या जिद्द, मेहनत, सातत्य आणि कलासाधनेची साक्ष देणारी ठरली. या सुवर्ण कामगिरीमुळे संबंधित विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाच्या संघात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे हे यश केवळ एका स्पर्धेतील विजय न राहता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळालेली मोठी ओळख म्हणून पाहिले जात आहे. नृत्य दिग्दर्शक रामचंद्र आईर यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली. त्यांच्यासोबत शरावती शेट्टी, तेजस म्हस्के, विठ्ठल तळवळकर, रुचिता शिर्के, मानसी कुलकर्णी उपस्थित होते. लोकनृत्य संघामध्ये प्राची प्रकाश करमळकर, सानिका संतोष गावकर, कीर्ती काशीराम गावडे, साक्षी अजित सावंत, गायत्री सदानंद राऊळ, योजना मनोज लोंढे, हर्षिता प्रवीण तारकर, वैष्णवी काशीराम गावडे आणि सोनाली कृष्णा जाधव यांनी सहभाग घेतला. या नृत्याला गीतगायन व संगीताची साथ हर्षद रामकृष्ण तळवणकर, समर्थ संतोष गवंडी, अर्जुन विजय गावकर आणि प्रज्योत खडपकर यांनी दिली. प्रा. हर्षदा परब यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
चौकट संस्थेच्या वतीने अभिनंदन या ऐतिहासिक यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोसले, कार्याध्यक्ष राणीसाहेब श्रीमंत शुभदादेवी भोसले, कार्यकारी विश्वस्त युवराज लक्ष्मीसावंत भोसले, युवराणी तथा नगराध्यक्ष सौ. श्रद्धाराजे भोसले तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल यांनी सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शकांचे आणि सहकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन केले.