भर पावसात खड्डे बुजविण्याचे काम करणाऱ्या नगरपालिका प्रशासनास स्थानिकांनी रोखले

⚡मालवण ता.०८-: भर पावसात मालवण वायरी येथील मुख्य रस्त्याला पडलेले खड्डे बुजविण्याचे आज भर नगरपालिकेच्या ठेकेदाराने सुरू केलेले काम स्थानिक रोखून धरीत हे काम बंद पडले. या रस्त्यावरून वाहनांची सतत ये- जा सुरू असल्याने रात्रीच्या वेळी हे काम करावे असे संबंधित ठेकेदारास सांगण्यात आले असल्याची माहिती ठाकरे शिवसेना गटाचे पदाधिकारी तपस्वी मयेकर यांनी दिली.

गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने आजपासून पुन्हा सुरुवात केली. पाऊस सुरू असल्याचे माहिती असतानाही नगरपालिकेच्या ठेकेदाराकडून वायरी येथील मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले. भर पावसात सिमेंटने खड्डे बुजविले जात असल्याचे पाहून स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. या रस्त्यावरून दिवसभर वाहनांची ये-जा सुरू असल्याने बुजविलेले खड्डे पावसाच्या पाण्याने तसेच त्यावरून जाणाऱ्या वाहनांमुळे पुन्हा उखडत असल्याने हे खड्डे बुजवून उपयोग काय असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित करत हे काम रोखले. हे काम रात्रीच्या वेळेस वाहतूक बंद असताना करण्यात यावे अशा सूचना संबंधित ठेकेदारास करण्यात आल्या असल्याचे श्री. मयेकर यांनी सांगितले.

You cannot copy content of this page