पर्यटन सभापती मोहिनी मडगावकर यांची ग्वाही; स्टॉल धारकांनी घेतली मोहिनी मडगावकरांची भेट..

⚡सावंतवाडी, ता. ९-: सावंतवाडी शहरातील स्टॉलधारकांनी आपल्या विविध समस्या पर्यटन सभापती मोहिनी मडगावकर यांच्यासमोर मांडत, “आम्ही बेरोजगार असल्याने स्टॉल लावून उदरनिर्वाह करीत आहोत. हे स्टॉल अनधिकृत असल्याची आम्हाला जाणीव आहे; मात्र हा आमच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. शहरात अशा प्रकारची अनेक दुकाने व स्टॉल आहेत. त्यामुळे आमच्या पोटावर पाय आणू नये,” अशी कळकळीची विनंती केली.
यावेळी स्टॉलधारकांनी आपल्या उदरनिर्वाहाचा प्रश्न लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. त्यावर पर्यटन सभापती मोहिनी मडगावकर यांनी, “आम्ही जनतेतून निवडून आलो असून कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, सभापती, नगरसेवक व नगरसेविका या सर्वांशी चर्चा करून या प्रश्नावर लवकरच मार्ग काढला जाईल,” अशी ग्वाही दिली.
शहरातील फिरते स्टॉल तसेच सायंकाळच्या वेळेत व्यवसाय करणाऱ्या स्टॉलधारकांसाठी स्वतंत्र ‘खाऊ गल्ली’ निर्माण करून त्यांना तेथे व्यवसायाची संधी देण्याचा पर्याय विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले. हा विषय नगरपरिषदेच्या कौन्सिलमध्येही मांडण्यात आला असून, सर्वांशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल, असे मडगावकर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, काही स्टॉल नगरपालिकेच्या ताब्यात असल्यास संबंधितांनी ते स्टॉल परत मिळावेत, यासाठी नगरपालिकेकडे अर्ज करावा, असे आवाहनही त्यांनी केले. कोणाचेही नुकसान होणार नाही, तसेच कोणावरही अन्याय केला जाणार नाही. सर्वांना विश्वासात घेऊन लवकरात लवकर या प्रश्नावर तोडगा काढण्याचा शब्द त्यांनी स्टॉलधारकांना दिला.
