हत्ती बाधित ग्रामस्थांचे वनविभागासमोर आंदोलन ; मंत्री केसरकर यांच्या आश्वासनाअंती माघार, राजन तेलीचीही शिष्ठाई..
⚡सावंतवाडी ता.१०-: हत्ती हटाव दोडामार्ग बचाव अशा आक्रमक घोषणा देत दोडामार्ग तालुक्यातील हत्ती बाधित गावातील संतप्त ग्रामस्थांनी आज येथील वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. जोपर्यंत हत्ती हटावाबाबत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही अशीच भूमिका ग्रामस्थांनी घेत तब्बल सहा तास कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
अखेर येत्या पंधरा दिवसात मंत्रालयात हत्ती हटाव संदर्भात वनमंत्र्यासोबत बैठक घेण्याचे आश्वासन शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी दिले तशाप्रकारचे लेखी पत्र वनविभागाकडून देण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.
दोडामार्ग तालुक्यात गेली २२ वर्ष हत्ती प्रश्न ग्रामस्थांना भेडसावत आहे. या प्राण्यांकडून शेती बागायतीचे होणारे अतोनात नुकसान पाहता शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शासनस्तरावर वारंवार मागणी करुनही हत्तीचा प्रश्न सोडविण्यास त्यांना यश आले नाही. परिणामी दोडामार्ग तालुक्यात स्थिरावलेल्या हत्तीकडून बागायतीसोबत शेतीचे नुकसान सत्र सुरुच आहे. या नुकसानीने त्रस्त झालेल्या केर, मोर्ले, घोटगेवाडी, कोनाळ, पाळये, सोनावल, हेवाळे, मुळस, बाबरवाडी या ग्रामस्थांनी आज थेट सावंतवाडी गाठत उपवनसंरक्षक एस नवकिशोर रेड्डी यांच्या कार्यालयावर धडक दिली यावेळी त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत आम्हाला नुकसान भरपाई नको मात्र हत्तींना आवरा असे एकच मागणी लावून धरली
