बांदा प्रा आ केंद्रात तात्काळ वैद्यकीय अधिकारी द्या

बांदा ग्राम पंचायतीने दिले जिल्हा परिषद प्रशासक नायर यांना निवेदन

बांदा/प्रतिनिधी
रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेता बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्याची तात्काळ नेमणूक करण्यात यावी अशी लेखी मागणी बांदा ग्रामपंचायतच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्याकडे आज करण्यात आली. नायर यांनी यावेळी कोकण आयुक्त यांच्याशी चर्चा करून वैद्यकीय अधिकारी नेमणूकसाठी तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.


वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांची भेडशी येथे बदली झाल्यानंतर गेले दोन महिने हे पद रिक्त आहे. याठिकाणी सर्वाधिक ओपिडी असून टेलिमेडिसिन केंद्र देखील आहे. बांदा हे महामार्गावरील महत्वाचे केंद्र असून याठिकाणी प्रसूती गृह आहे. वैद्यकीय अधिकारी नसल्याने याचा परिणाम आरोग्य सेवेवर झाला आहे.
एमबीबीएस अधिकारी नसल्याने रुग्ण, नातेवाईक व विद्यार्थी यांना दाखले मिळविण्यासाठी सावंतवाडी किंवा ओरोस येथे जावे लागते. यामध्ये वेळ व आर्थिक त्रास सहन करावा लागतो. यासाठी लवकरात लवकर वैद्यकीय अधिकारी देण्याची विनंती करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी नायर यांनी कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब, माजी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, सिद्धेश महाजन, शैलेश केसरकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page