Headlines

दुष्काळी मदतीचे स्वागत…

दिवाळीपूर्वी पाच हजारांचे अग्रीम अर्थसाहाय्य; भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्याकडून मुख्यमंत्री फडणवीस यांचे अभिनंदन..

⚡ओरोस, ता. १५-: राज्यातील ३०५ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांचे अग्रीम अर्थसाहाय्य जमा करण्याचा राज्य सरकारचा निर्णय दिलासादायक आहे. सिंधुदुर्गातील सर्व आठही तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही या निर्णयाचा लाभ होणार आहे. या शेतकरीहिताच्या निर्णयाबद्दल भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारचे अभिनंदन केले आहे.
राज्यात गेल्या पाच दशकांत अनुभवला नाही, अशा भीषण दुष्काळाचे सावट असताना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने पिण्याचे पाणी, पीक आणि चारा नियोजनाबरोबरच विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अग्रीम मदत देण्याचा निर्णय महत्त्वपूर्ण असून, त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाला आधार मिळणार असल्याचे सावंत यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांकडे कर्जवसुलीसाठी तगादा लावणाऱ्या यंत्रणांना मुख्यमंत्र्यांनी सक्त सूचना दिल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, जनावरांसाठी चाऱ्याचे नियोजन आणि चारा पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्याबाबत सरकारने पावले उचलली आहेत. शेतकऱ्यांकडून हमीभावाने चारा खरेदी करण्याचा निर्णयही महत्त्वाचा आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आल्याने शेतकरी कुटुंबांवरील आर्थिक भार काही प्रमाणात हलका होणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.
राज्यात साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषिपंपांना मोफत वीजपुरवठा केला जात आहे. केंद्र सरकारची पीएम किसान सन्मान निधी योजना आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेतून पात्र शेतकऱ्यांना वर्षाला एकूण १२ हजार रुपयांची मदत मिळत आहे. या योजनांसह पीकविमा, कृषिपंपांची वीजबिल माफी आणि दुष्काळी मदतीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळत असल्याचे सावंत यांनी नमूद केले.
दुष्काळ ही नैसर्गिक आपत्ती असून, त्याचा सामना करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. मात्र, या गंभीर प्रश्नावर विरोधकांकडून राजकारण केले जात असल्याची टीकाही त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या संकटाच्या काळात राजकीय मतभेद बाजूला ठेवून सरकारच्या उपाययोजनांना साथ द्यावी. भविष्यात दुष्काळाचे संकट कायमस्वरूपी दूर करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सावंत यांनी केले.

चौकट
कर्नाटकपेक्षा दुप्पट मदतीचा दावा
महाराष्ट्र सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी पाच हजार रुपयांची अग्रीम मदत जाहीर केली आहे. त्या तुलनेत कर्नाटकातील काँग्रेस सरकारने केवळ अडीच हजार रुपयांची मदत जाहीर केल्याचा दावा प्रभाकर सावंत यांनी केला. महाराष्ट्रातील मदत कर्नाटकच्या तुलनेत दुप्पट असून, कर्नाटक सरकार अद्याप केंद्राच्या मदतीची प्रतीक्षा करीत असल्याची टीका त्यांनी केली. तेथील शेतकऱ्यांना ही मदत वेळेत मिळेल का, असा सवालही सावंत यांनी उपस्थित केला. काँग्रेसशासित राज्यांनी महाराष्ट्र सरकारच्या शेतकरीहिताच्या निर्णयांचे अनुकरण करावे, असेही ते म्हणाले.

फोटो:- प्रभाकर सावंत

You cannot copy content of this page