Headlines

पोलिस दलात वाचनाचा जागर…

वाचन प्रेरणा दिन उत्साहात; दररोज किमान एक पान वाचण्याचा संकल्प..

⚡ओरोस, ता. १५-: वाचनातून वैचारिक समृद्धी साधण्याबरोबरच मानसिक ताणतणाव दूर करण्यासाठी पुस्तकांशी मैत्री करण्याचा संदेश देत सिंधुदुर्ग पोलिस दलात आज ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त पोलिस अधिकारी, अंमलदार, त्यांचे कुटुंबीय आणि विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जोपासण्याचा संकल्प केला. ‘दररोज किमान एक पान वाचा,’ असा संदेश यावेळी देण्यात आला.
सिंधुदुर्गनगरी येथील पोलिस वसाहतीमधील गणेश हॉलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वेंगुर्ले येथील साहित्यिक कुंदन कांबळी, कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे ग्रंथपाल अरुण मांजरे आणि फोंडाघाट न्यू इंग्लिश स्कूलचे प्राध्यापक ज्ञानोबा फड उपस्थित होते.
मान्यवरांनी डॉ. कलाम यांच्या जीवनकार्याचा आणि विचारांचा आढावा घेत वाचनाचे महत्त्व विशद केले. व्यक्तिमत्त्व विकास, ज्ञानवृद्धी आणि सकारात्मक विचारसरणी घडविण्यासाठी नियमित वाचन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. बदलत्या जीवनशैलीत वाढणारा मानसिक ताण कमी करण्यासाठी तसेच वैचारिक प्रगल्भता वाढविण्यासाठी पुस्तकांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. पोलिस दलातील अधिकारी व अंमलदारांबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांना लहानपणापासून पुस्तकांची गोडी लागावी, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांनी नियमित वाचन करण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमाला सिंधुदुर्गचे पोलिस अधीक्षक डॉ मोहन दहिकर, अपर पोलिस अधीक्षक नयोनी साटम, पोलिस अधिकारी, अंमलदार, त्यांचे कुटुंबीय तसेच ओरोस येथील न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते.

You cannot copy content of this page