‘भूतकाळ बदलता येत नाही; वर्तमानातील प्रयत्नांतून भविष्य घडवता येते’ :क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट रेश्मा भाईप..
⚡सिंधुदुर्ग,ता.१५-: जागतिक मानसिक आरोग्य दिन सप्ताहानिमित्त 10 ते 16 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘मन जागृती’ राष्ट्रीय मानसिक आरोग्य जनजागृती अभियानांतर्गत जिल्हा मानसिक आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालयाच्या वतीने ओरस येथील जिल्हा कारागृह क्रमांक 1 मध्ये ‘कैदी आणि मानसिक आरोग्य’ या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमात क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट रेश्मा भाईप यांनी कैद्यांच्या मानसिक आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी कारागृह प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हा रुग्णालयातील मनोरुग्ण परिचारिका श्रीमती कावले आणि श्रीमती वरदम उपस्थित होत्या.
मार्गदर्शन करताना रेश्मा भाईप म्हणाल्या की, मानसिक आरोग्य हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. शारीरिक आरोग्याप्रमाणेच मानसिक आरोग्याची काळजी घेणेही आवश्यक आहे. कैदी म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर तुरुंगाच्या भिंती, बंद दरवाजे, शिक्षा आणि गुन्हेगारीची चित्रे उभी राहतात; मात्र या भिंतींच्या आतही भावना, आशा, स्वप्ने, कुटुंबाविषयी प्रेम आणि भविष्याबद्दल चिंता असलेली व्यक्ती असते.
कारागृहातील जीवनामुळे अनेक व्यक्तींना एकटेपणा, नैराश्य, अपराधीपणाची भावना, राग, भीती आणि मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत कैद्यांना योग्य मानसिक आधार, समुपदेशन आणि पुनर्वसनाच्या सुविधा उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता त्याविषयी मोकळेपणाने संवाद साधणे आणि गरजेनुसार तज्ज्ञांची मदत घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी ‘भूतकाळ बदलता येत नाही; पण वर्तमानातील प्रयत्नांतून भविष्य घडवता येते’ हा सकारात्मक संदेश देण्यात आला.

