वीज अधीक्षक अभियंत्यांना नागरिकांनी चार तास ठेवले घेरून

कंत्राटी कर्मचारी धनंजय फाले निधनामुळे सर्वपक्षीय आक्रमक

कुडाळ : प्रतिनिधी
महावितरण कंत्राटी कर्मचारी धनंजय फाले याचा उपचारादरम्यान आज सकाळी गोवा-बांबुळी येथे मुत्यू झाला. त्यामुळे फाले कुटुंबियांना अधिकाधिक मदत मिळावी यासाठी कुडाळमधील सर्वपक्षीयांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांना त्यांच्याच दालनात घेरत धारेवर धरले. यावेळी काही प्रश्नावर अधिक्षक अनुत्तरित झाल्याने उपस्थित नागरिकांनी त्यांना चांगलेच फैलावर घेत महावितरणमधील अधिकार्‍यांच्या भोंगळ कारभाराचा पाढाच वाचला. अखेर आक्रमक नागरिकांचा पावित्रा पाहून विनोद पाटील यांनी आपले म्हणणे लेखी स्वरूपात दिले. तब्बल चार तास कुडाळमधील नागरिकांनी विनोद पाटील यांना अक्षरशः घाम फोडला.


शहरातील अभिमन्यू हॉटेल समोरील वीज वितरण कंपनीच्या पोलावर दुरुस्तीचे काम करीत असताना अचानक ११ केव्हीच्या वीजवाहिनीचा शॉक लागून वीज वितरण कंपनीचे कंत्राटी वायरमन धनंजय बाबू फाले (रा. महादेवाचे केरवडे, सध्या, राहणार पिंगुळी) हे पोलवरच चिकटून राहिल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर अधिक उपचारासाठी गोवा -बांबुळी येथे नेण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान आज शुक्रवारी सकाळी १०.३० वा. त्यांचे निधन झाले. त्यामुळे कुडाळमधील नागरिकांनी संतप्त होत अधिक्षक अभियंता विनोद पाटील यांचे महावितरणमधील ऑफिस गाठले. अधिक्षक अभियंता पाटील कार्यालयीन कामानिमित्ताने बाहेर गेले असल्याने कुडाळमधील प्रमुख मंडळींनी त्यांच्या सहाय्यक अधिकार्‍यांशी चर्चा सुरू केली. पण ते अपेक्षित माहिती देवू शकले नाहीत. दरम्यानच्यावेळी अधिक्षक विनोद पाटील उपस्थित झाले. यावेळी सर्वांनीच आक्रमक भूमिका घेत पाटील यांना धारेवर धरत धनंजय फालेच्या मृत्यूस जबाबदार कोण? महावितरणकडून फाले कुटूंबियांना भरीव मदत मिळणार की नाही? फाले याच्या मृत्यूस परब महिला अधिकारीच जबाबदार असून त्यांना पाठीशी घातले जात आहे. त्यांच्यावर तत्काळ कारवाई करा, असे अनेक प्रश्न आणि सूचना आक्रमकतेने मांडून पाटील यांच्यावर प्रश्नांचा अक्षरशः भडीमार केला. यावेळी तब्बल दोन- सव्वा दोन तास उपस्थित प्रमुख मंडळींनी महावितरणच्या कारभाराचा पाढा वाचत अधिकारी वर्गाच्या भोंगळ कारभारावर ताशेरे ओढले. अखेर उपस्थित प्रमुख मंडळींचा संताप पाहून पाटील यांनी लेखी उत्तर दिले. यात त्यांनी असे नमूद केले आहे की, कंत्राटी कर्मचारी कुडाळ येथे काम करत असताना २१ जुलै २०२३ रोजी अपघात झाला. सदर कर्मचार्‍याचा इएसआय कंत्राटी कर्मचारी एजन्सी भरणा करत असते. त्यामुळे इएसआय क्लेम करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर संबंधित रिशूकेचू कंपनी नाशिक या एजन्सीमार्फत १५ दिवसात अहवाल सादर करण्यात येईल. इलेक्ट्रिक इन्स्पेक्टरकडून तपासणी अहवाल महावितरणकडे प्राप्त झाल्यानंतर या घटनेत महावितरणचा कर्मचारी बेजबाबदार असल्यास संबंधित कर्मचार्‍यावर कंपनीच्या नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल. तसेच विद्युत निरीक्षक यांचा अहवाल प्राप्त झाल्यावर शाखा कार्यालयाच्या अधिकार्‍यांमार्फत या घटनेची माहिती पोलिस विभागात लेखी देण्यात येणार आहे.
तसेच मागील वर्षी वेंगुर्ले तालुक्यातील कंत्राटी कर्मचारी तनय सावंत यांचा असाच अपघाती मृत्यू झाला होता. मात्र, त्याच्या कुटुंबीयांना अद्याप जमा केलेली रक्कम मिळाली नसल्याचा आरोप जिल्हा वीज कंत्राटी संघटना अध्यक्ष अशोक सावंत यांनी केला. यापूर्वी अशाचप्रकारे जिल्ह्यात ८ ते ९ घटना घडलेल्या आहेत. मात्र, याबाबत महावितरण उदासीन आहे, असा आरोप केला.
यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कुडाळ पोलिसांची कुमक सज्ज होती. यावेळी राष्ट्रवादीचे काका कुडाळकर, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अभय शिरसाट, श्रीराम शिरसाट, मनसे माजी जिल्हाध्यक्ष धीरज परब, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, ठाकरे सेना तालुकाप्रमुख राजन नाईक, भाजपचे अशोक सावंत, भाजप तालुकाध्यक्ष दादा साईल, शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा वर्षा कुडाळकर, मंदार शिरसाट, शिवसेना तालुकाप्रमुख बंटी तुळसकर, उप तालुकाप्रमुख अरविंद करलकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page