मालवण (प्रतिनिधी)

मालवण तालुक्यातील उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित ओझर विद्यामंदिर, कांदळगाव या शाळेमध्ये ‘एस.एस.सी. बोर्ड परीक्षेचा राजमार्ग’ या उपक्रमांतर्गत आरोग्यविषयक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ‘विद्यार्थ्यांसाठी आहार’ या विषयावर मालवणमधील आहारतज्ज्ञ डॉ. गार्गी गौरव ओरसकर यांनी उपस्थित विद्यार्थी, पालक व शिक्षकांना सविस्तर मार्गदर्शन केले.
व्याख्यानादरम्यान डॉ. गार्गी ओरसकर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि मनाच्या एकाग्रतेसाठी योग्य आहाराचे महत्त्व अधोरेखित केले. आहारात प्रथिने (प्रोटीन्स), जीवनसत्त्वे (व्हिटॅमिन्स) आणि तंतुमय पदार्थांचा (फायबर) नियमित समावेश असावा, असे त्यांनी सांगितले. आहारामध्ये कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत आणि कोणते पदार्थ टाळले पाहिजेत याविषयी मार्गदर्शन केले. विशेषतः मुलांमध्ये ‘व्हिटॅमिन बी-१२’ आणि ‘व्हिटॅमिन डी’ चे प्रमाण योग्य राखण्याकडे अधिक लक्ष देण्याचा सल्ला त्यांनी दिला. शारीरिक सुदृढतेसाठी नियमित व्यायाम, ध्यानधारणा आणि मैदानी खेळांची नितांत गरज असून मुलांनी जंक फूड, तेलकट-तळलेले पदार्थ तसेच पॅकबंद अन्नपदार्थ पूर्णपणे टाळले पाहिजेत, असा आग्रह त्यांनी धरला. याशिवाय व्यसनांपासून दूर राहण्याबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना जागरूक केले. मुलांच्या दैनंदिन आहाराकडे योग्य लक्ष देण्यासाठी त्यांनी पालकांना विशेष सूचना दिल्या. पालकांच्या विनंतीनुसार व्याख्यानानंतर आरोग्याविषयी समस्या असलेल्या विद्यार्थ्यांना व पालकांना वैयक्तिक मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम ओझर विद्यामंदिर कांदळगाव शाळेच्या माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष राजेंद्र कदम यांच्यातर्फे प्रायोजित करण्यात आला होता. शाळेतील विद्यार्थी, पालक व शिक्षकांना मोलाचे आहारविषयक मार्गदर्शन केल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक डी. डी. जाधव यांनी डॉ. गार्गी ओरसकर यांचे आभार मानले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राकेश कदम उपस्थित होते. या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद लाभला.
