मालवण दि प्रतिनिधी

सायबर गुन्हेगार दूरवरूनही आर्थिक फसवणूक करू शकतात. गुन्ह्याची उकल झाली तरी फसवणुकीची संपूर्ण रक्कम परत मिळेलच याची खात्री नसते. त्यामुळे प्रत्येकाने सायबर गुन्ह्यांबाबत जागरूक राहून सावधगिरी बाळगावी, असे आवाहन आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातीवले यांनी केले.
वाचन प्रेरणा दिन आणि वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त रामेश्वर सार्वजनिक वाचनमंदिर, आचरा यांच्या वतीने दररोज पहाटे उन्हापावसाची पर्वा न करता वृत्तपत्रे वाचकांपर्यंत पोहोचविणारे वृत्तपत्र वाहक राजेंद्र यशवंत चव्हाण (कनेडी) यांचा संजय कातीवले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटनही करण्यात आले.
बँक ऑफ महाराष्ट्रच्या क्षमा कारेकर यांनी केवायसी अद्ययावत करणे, बंद खाती नियमित करणे आणि खात्यांमध्ये नामनिर्देशन नोंदविण्याचे आवाहन केले. यासंदर्भातील आवश्यक कार्यवाहीसाठी संबंधित खातेदारांनी ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत बँकेशी संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या वर्षा सांबारी, वाचनमंदिराचे अध्यक्ष बाबाजी भिसळे, उपाध्यक्ष अशोक कांबळी, कार्यवाह अर्जुन बापर्डेकर, वीरेंद्र पुजारे, विनिता कांबळी, सुगंधा गुरव, कामिनी ढेकणे, श्रद्धा महाजनी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा सांबारी यांनी केले, तर आभार बाबाजी भिसळे यांनी मानले.
