सिंधुदुर्गातील डीएडच्या उमेदवारांनी थेट शिर्डी गाठावे

युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांचा केसरकरांना टोला:आम्हाला सेवेत घेण्याची बुद्धी शिक्षणमंत्र्यांना द्यावी, अशी साईचरणी प्रार्थना करा

⚡कुडाळ ता.०२-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेरोजगार डीएडधारकांनी आता त्यांना नोकरी मिळावी असे वाटत असेल तर त्यांनी आता थेट शिर्डीत जाऊन साईबाबांचरणी प्रार्थना करावी की शिक्षणमंत्र्यांना चांगली बुध्दी द्यावी आणि आम्हाला स्थानिकांना सेवेत रुजू करावे. अशी प्रार्थना केली तरच ते नोकरीला लागू शकतात. काल परवा केसरकरांनी प्रतिक्रिया दिली की कोल्हापूरमध्ये पाणी आले नाही, कारण मी शिर्डीत होतो, या केसरकर यांच्या वक्तव्यावर कुडाळ युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी
केसरकरांना टोला लगावला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कबड्डीच्या खेळाडूंचे वाटोळे करण्यात देखील केसरकर यशस्वी झाले. केसरकर हे ४२ वी कुमार गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी २०१६ स्पर्धेत अंदाजे ४६ लाखाच्या घोटाळ्या दरम्यान बेकायदेशीर अध्यक्ष होते. आता सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन विरुद्ध सिंधुदुर्ग कबड्डी असोसिएशन असा वाद चालू आहे. हा वाद वास्तविक बेकायदेशीर अध्यक्ष म्हणून केसरकरांनी मिटवला पाहिजे होता. मात्र, प्रकरण अंगलट येत असल्याचे समजताच केसरकरांनी हातच वर केले.
आता कबड्डी स्पर्धा कशा भरवायच्या ? कोणाच्या मान्यतेने भरवायच्या? हा प्रश्न आयोजकांना पडला आहे. यात आयोजकांचे मानसिक खच्चीकरण करण्याचे काम चालू आहे. सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे पराक्रम बघता राज्य कबड्डी असोसिएशनने सिंधुदुर्ग कबड्डी असोसिएशनला मान्यता दिली पाहिजे होती. परंतु, केसरकरांच्या दबावापोटी निर्णय होत नाही अशी शंका आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खेळाडूंचे नुकसान होत आहे. धर्मादाय आयुक्त आणि जिल्हा क्रीडा अधिकारी तसेच राज्य कबड्डी असोसिएशनने या संदर्भात लवकर निर्णय घ्यावेत. तसेच याप्रकरणी कबड्डी स्पर्धा आयोजक म्हणून राज्य कबड्डी असोसिएशनकडे पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचे युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी स्पष्ट केले.

You cannot copy content of this page