अॅड. समीर वंजारी:आरोग्य विभागातील कथित आर्थिक अनियमिततेचीही चौकशी करा,अन्यथा न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार..

⚡सावंतवाडी ता.१३-:
सावंतवाडी नगरपालिकेतील पाणीपुरवठा प्रकरणावरून गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा समितीचे सभापती प्रतीक बांधेकर यांच्या राजीनाम्याने या प्रकरणाचा शेवट होऊ शकत नाही. केवळ एका सभापतींच्या राजीनाम्याने इतर संभाव्य जबाबदार व्यक्तींची जबाबदारी संपत नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड. समीर वंजारी यांनी केली आहे.
पाणीपुरवठा प्रकरणासोबतच नगरपालिकेतील इतर विभागांच्या कामकाजाचीही तपासणी व्हावी. निविदा प्रक्रिया, खरेदी, देयके, प्रशासकीय मंजुरी आणि सार्वजनिक निधीच्या विनियोगाची नियमानुसार पडताळणी करावी. दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
आरोग्य विभागातील कथित आर्थिक अनियमिततेचीही चौकशी करा..
महायुतीतील शिंदे गटाच्या नगरसेवकाने तसेच माजी नगराध्यक्षांनी आरोग्य विभागाच्या कामकाजाबाबत केलेल्या आरोप हे ठोस भरावे असल्याशिवाय अशी वक्तव्य केले नसावे त्यामुळे प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी. या संदर्भात चर्चेत आलेल्या ११ लाख रुपयांच्या यंत्रसामग्री खरेदीचा आणि २३ लाख रुपयांच्या बिलाच्या अदायगीचा अधिकृत कागदपत्रांच्या आधारे तपास व्हावा. खरेदी प्रक्रिया नियमानुसार झाली होती का, प्रत्यक्ष काम किती झाले आणि देयकांना कोणत्या आधारावर मंजुरी देण्यात आली, याची स्पष्टता आवश्यक आहे.
हे आरोप सिद्ध झालेले आहेत, असे गृहीत न धरता संबंधित कागदपत्रे आणि व्यवहारांची स्वतंत्र चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, असे अॅड. वंजारी यांनी स्पष्ट केले
🌍नगराध्यक्षांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी!
नगरपालिकेतील पाणीपुरवठा, आरोग्य विभाग आणि नागरी सुविधांबाबत वारंवार प्रश्न उपस्थित होत आहेत त्यामुळे यावरून नगराध्यक्षांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो अशामुळे नगराध्यक्षांनी जनतेला स्पष्ट उत्तरे व कृतीतून उत्तर देणे आवश्यक आहे. या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि प्रशासनावरील जनतेचा विश्वास टिकून राहावा, यासाठी वेळ पडल्यास नगराध्यक्षा यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून व घराण्याचा आब राखून राजीनामा द्यावा, अशी ठाम मागणी अॅड. वंजारी यांनी केली.
“जनतेला केवळ राजीनामे नकोत, तर सत्य आणि जबाबदारी निश्चित झालेली हवी. सार्वजनिक निधीचा प्रत्येक रुपया कुठे आणि कसा खर्च झाला, याचा हिशेब मिळालाच पाहिजे,” असे त्यांनी सांगितले.
या सर्व प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून आवश्यक कागदपत्रे व निष्कर्ष जनतेसमोर मांडावेत. कोणालाही राजकीय संरक्षण मिळू नये आणि पुराव्याविना कोणावरही अन्याय होऊ नये, ही काँग्रेसची भूमिका असल्याचेही त्यांनी नमूद केले.
🌏गरज पडल्यास न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार!
नगरपालिकेतील या प्रकरणांची योग्य चौकशी झाली नाही, तर जनहितासाठी न्यायालयात जनहित याचिका (PIL) दाखल करण्याचा पर्याय स्वीकारला जाईल. तसेच उपलब्ध पुरावे आणि कायदेशीर प्रक्रियेच्या आधारे संबंधित प्रकरणांची विशेष तपास पथकामार्फत (SIT) चौकशी करण्याची मागणी केली जाईल. आवश्यकतेनुसार रोग झालेला संबंधितांच्या वैयक्तिक आर्थिक व्यवहारांचीही कायदेशीर चौकशी व्हावी, अशी भूमिका अॅड. वंजारी यांनी मांडली.
