Headlines

साळिस्ते येथे दोन कारची जोरदार धडक…

एकाच कुटुंबातील चौघे जखमी:अपघातानंतर दुसऱ्या कारचा चालक न थांबता पसार,कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

⚡कणकवली ता.१३-: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील साळिस्ते येथील वनश्री हॉटेलजवळ रविवारी (११ ऑक्टोबर) सायंकाळी दोन कारमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात कुडाळ येथील एकाच कुटुंबातील चौघे जखमी झाले असून, त्यांच्या कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातानंतर दुसऱ्या कारचा चालक घटनास्थळी न थांबता निघून गेल्याने त्याच्याविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनील सुरेश कुबल (वय ४७, रा. कुडाळ) हे आपल्या वडिलांसह, पत्नी आणि मुलासोबत खारेपाटण येथे काकींना भेटण्यासाठी गेले होते. तेथून सायंकाळी सहाच्या सुमारास कुडाळच्या दिशेने परतत असताना साळिस्ते येथील वनश्री हॉटेलजवळ त्यांच्या हुंडाई सेंट्रो कारला होंडा ब्रिओ कारने धडक दिली. या धडकेनंतर सेंट्रो कार चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेली आणि महामार्गाच्या मधोमध असलेल्या दुभाजकावर आदळली. त्यानंतर कारने चार वेळा पलटी घेतली आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर जाऊन थांबली.

या अपघातात सुनील कुबल यांच्या डोक्याला, हाताला, मानेला व पाठीला दुखापत झाली. त्यांचे वडील सुरेश कुबल यांच्या डोक्याला, मानेला व पाठीला दुखापत झाली असून, जबड्याच्या उजव्या बाजूच्या हाडाला फ्रॅक्चर झाले आहे. पत्नी जुई आणि मुलगा आर्यन यांनाही किरकोळ दुखापत झाली. अपघातात सेंट्रो कारचे पत्रे चेपले असून, सर्व काचा फुटल्या आहेत.

या अपघातास कारणीभूत ठरल्याचा आरोप असलेली होंडा ब्रिओ कारचा चालक अपघातानंतर घटनास्थळी न थांबता निघून गेला. या प्रकरणी डोंबिवली येथील प्रशांत भगवंत राणे (वय ४६) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १८४, १२५(अ), १२५(ब) आणि २८१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मिलिंद देसाई करत आहेत.

You cannot copy content of this page