विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन; आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते उद्घाटन..

⚡वेंगुर्ला, ता. १३-: वेताळ प्रतिष्ठान तुळस, भाजपा वेंगुर्ला आणि इनरव्हील क्लब वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने भाजपा राज्य युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हजारो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
भाजपाचे विधान परिषद आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजपा राज्य युवा नेते विशाल परब, वेंगुर्ला नगराध्यक्ष राजन गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, सौ. जठार, डॉ. चौगुले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
शिबिराच्या प्रारंभी प्रा. डॉ. सचिन परुळकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन बादल चौधरी व निलेश गुरव यांनी केले, तर बाळू देसाई यांनी आभार मानले.
यावेळी आमदार प्रमोद जठार यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच नगराध्यक्ष राजन गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्यासह सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. महाआरोग्य शिबिराच्या आयोजनात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल वेताळ प्रतिष्ठान तुळस आणि इनरव्हील क्लब वेंगुर्ला यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
वेंगुर्ला तालुक्यातील आशा स्वयंसेविकांना युवा नेते विशाल परब यांच्या वतीने विशेष भेटवस्तू देण्यात आल्या. मान्यवरांच्या हस्ते या भेटवस्तू आशा स्वयंसेविकांना प्रदान करण्यात आल्या.
दरम्यान, नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आयोजित करण्यात आलेल्या या महाआरोग्य शिबिराला वेंगुर्ला तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. शिबिरात हजारो नागरिकांनी सहभाग नोंदवत विविध आरोग्यसेवांचा लाभ घेतला. विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.
