राष्ट्रवादी युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष शैलेश लाड यांचा आरोप
बांदा/प्रतिनिधी
झाराप पत्रादेवी चौपदरी महामार्गाच्या २२ किलोमीटर मार्गातील दुभाजकात तब्बल ७२ कोटी रुपये खर्चून लावण्यात आलेली झाडे हि अतिवृष्टीत कुजल्याने या कामात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष शैलेश लाड यांनी केला आहे. या कामाची सखोल चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांचे लक्ष वेधणार असल्याचे श्री लाड यांनी सांगितले.
श्री लाड यांनी आज बांदा ते झाराप महामार्गची मधील दुभाजकातील लावण्यात आलेल्या झाडांची पाहणी केली. त्यावेळी त्यातील ९० टक्के झाडे हि मृतावस्थेत आढळली. केवळ ठेकेदारांच्या आर्थिक फायद्यासाठी व अधिकाऱ्यांनी मलिदा लाटण्यासाठीच हि निविदा मार्जितील माणसांना दिल्याचा आरोप देखील त्यांनी केला.
दरवर्षी निविदा काढून झाडांची लागवड करण्यात येते. मात्र त्यांची योग्य मशागत किंवा निगा राखण्यात येत नसल्याने हि झाडे लागवडीनंतर आठ दिवसात मृत होत आहेत. सदर ठेकेदारांवर कारवाई करत त्यांच्याकडून पैसे वसुल करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात श्री लाड यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रभारी उपअभियंता एम आर साळुंखे यांच्याशी संपर्क साधत कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत प्रशांत गवस, शैलेश गवस उपस्थित होते.
