गेले चार दिवस शाळकरी मुलांचे होत आहेत हाल:पुलाची उंची वाढविण्याची ग्रामस्थांची मागणी
वैभववाडी प्रतिनिधी
दीगशी – तिथवली मार्गावरील कॉजवे पुराच्या पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. गेली चार दिवस मार्गावर पाणी असल्याने शाळकरी मुलांचे हाल होत आहेत. या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.
तालुक्यात गेली चार दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. अतीवृष्टीत बऱ्याच गावांचा, वाड्यांचा संपर्क तुटला आहे. या पावसाचा फटका दीगशी – तिथवली मार्गाला बसला आहे. मार्गावरील मोरेवाडी नजीकचा कॉजवे गेले चार दिवस पाण्याखाली आहे. तिथवली विद्यालय व प्राथमिक शाळेत जाणाऱ्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मार्ग बंद असल्याने त्यांना घरीच थांबावे लागत आहे.
या मार्गावरून खारेपाटण – वैभववाडी व वैभववाडी – खारेपाटण अशा दोन फे-या सुरु आहे. या मार्गाचे काम पाच वर्षापूर्वी पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून करण्यात आले होते. त्यापूर्वी देखील या व्हाळावर जुना कॉजव होता. नवीन काम करण्यापुर्वी सदर कॉजवेची उंची वाढवण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांची होती. परंतु संबंधित विभागाने त्याच उंचीचा कॉजवे बांधला. त्याचा नाहक त्रास आता वाहनचालक, प्रवासी व नागरिकांना सहन करावा लागत आहे.मोरेवाडी, पाष्टेवाडी, सोलकरवाडी व पाटीलवाडी ग्रामस्थांना देखील याचा मोठा फटका बसत आहे.
