डी.एड व बी.एड होऊन नोकरीसाठी रखडलेल्या पात्र उमेदवारांना संधी द्या

सेवानिवृत्त शिक्षक संघटनांच्या सहविचार सभेत केली सूचना

⚡कणकवली ता.०८-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शाळेत सुमारे ११५० शिक्षक पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या मुलांची आबाळ होत असून प्रचंड मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक वर्षे डी.एड व बी.एड होऊन नोकरीसाठी रखडलेल्या पात्र उमेदवारांना संधी देण्यात यावी.अशी मागणी करण्यात आल्याची माहिती सुरेश पेडणेकर, चंद्रकांत अणावकर, सुधाकर देवस्थळी, बाबू परब व भानू तळगावकर यांनी प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात दिली आहे

शिक्षक ही समस्या कोकण विभागात येणाऱ्या रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग यासारख्या जिल्ह्यांमध्ये अति तीव्र आहे. यासाठी शासनाकडून विलंबाने होणारी शिक्षक भरती, त्यात येणाऱ्या कायदेशीर व न्यायिक प्रकारच्या अनेक अडचणी, मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यातून बदलीने अन्य बाहेरील जिल्ह्यात जाणारे शिक्षक यासारख्या गंभीर समस्यांमुळे मुलांचे मात्र अतोनात कधीही न भरुन येणारे नुकसान हे होत आहे.
यासाठी शासनाने तात्पुरत्या स्वरुपात शिक्षक पदे अन्य मार्गांनी भरण्याचे सूचित केले आहे. त्यातील एक पर्याय म्हणून प्राधान्यक्रमाने सेवानिवृत्त शिक्षकांमधून एकत्रित मानधन तत्वावर शिक्षक घेण्यात यावेत असे आहे. व असे शिक्षक उपलब्ध न झाल्यास अन्य उमेदवारांचे पर्याय देण्यात आलेले आहेत. या पर्यायातील पहिल्या पर्यायासाठी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी दि. ०७/०७/२०२३ रोजी आपल्या दालनात सेवानिवृत्त शिक्षक संघटनांची सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी शिक्षक प्रतिनिधी व संघटना पदाधिकारी उपस्थित होते. यासभेत होणाऱ्या निर्णयानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा होणार होती. परंतु कार्य बाहुल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी हे उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यामुळे सर्व चर्चा शिक्षणाधिकारी यांच्याच दालनात पार पडली.
मात्र या सहविचार सभेत सेवानिवृत्त शिक्षकांच्या शिक्षक व संघटना प्रतिनिधींकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक वर्षे डी.एड व बी.एड होऊन नोकरीसाठी रखडलेल्या पात्र उमेदवारांना याची संधी देण्यात यावी. त्यांना नोकरीची संधी नसल्यामुळे त्यांच्या उमेदीतील अनेक वर्षे वाया चालली आहेत. अशावेळी निवृत्ती वेतन मिळणाऱ्या शिक्षकांना आणखी मानधनाची आवश्यकता नाही. मात्र ती गरज या उमेदवारांसाठी आहे. अशाप्रकारचे सर्व मुद्दे उपस्थित करुन या जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षकांनी याकामासाठी ठामपणे आपला नकार दर्शविला आहे. यासाठी निवृत्त शिक्षकांनी वरील नमुद केलेल्या पात्र उमेदवारांना ही संधी देण्याची आग्रही भूमिका मांडली. तसेच सदर नियुक्तींबाबत जी कार्यवाही असेल ती शक्य तितक्या लवकर करुन या जिल्ह्यातील प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या मुलांचे नुकसान टाळावे अशी विनंती केली आहे.
अशी माहिती सुरेश पेडणेकर, चंद्रकांत अणावकर, सुधाकर देवस्थळी, बाबू परब व भानू तळगावकर यांनी प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात दिली आहे.

You cannot copy content of this page