एक लाखाचे नुकसान:पाऊस व जोरदार वारामुळे तालुक्यात पडझडीच्या घटना..
⚡मालवण ता.०७-: गेले काही दिवस मालवण तालुक्याला झोडपून काढणाऱ्या पावसाने आज काहीशी उसंत घेत अधून मधून हजेरी लावली. मात्र पावसामुळे तालुक्यात पडझडीच्या घटना सुरूच आहेत. कुंभारमाठ येथील शासकीय तंत्रनिकेतनची संरक्षक भिंत कोसळून सुमारे १ लाखाचे नुकसान झाले तर साळेल येथे घरावर माड कोसळून घराचे नुकसान झाले.
मालवणात गेले पाच- सहा दिवस मुसळधार पाऊस सातत्याने पडत असल्याने तालुका जलमय झाला आहे. तालुक्यातील गडनदीच्या पात्रातही वाढ झाली आहे. तर अनेक सखल भागात पाणी भरले असून काही ठिकाणी रस्त्यावरही पाणी आले आहे. आज मालवणात पावसाने अधून मधून हजेरी लावली.

पाऊस व जोरदार वारा यामुळे तालुक्यात विविध पडझडीच्या घटना घडून नुकसान झाले आहे. कुंभारमाठ येथील शासकीय तंत्रनिकेतनची संरक्षक भिंत कोसळल्याने ९९ हजार २५० रुपयांचे नुकसान झाले आहे. साळेल येथील सुनीता नामदेव जाधव यांच्या घरावर माड कोसळल्याने छप्पर तुटल्याने सुमारे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले. तर मुसळधार पावसामुळे मालवण देऊळवाडा येथील कोचरेकर यांच्या मातीच्या पडीक घराच्या भिंती कोसळू लागल्या आहेत, यामुळे भिंत कोसळून शेजारील घरालाही धोका पोहचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे.
