तारकर्लीतील इसदाला जल पर्यटन प्रशिक्षण संस्था म्हणून मान्यता

प्रशिक्षणासह प्रमाणपत्र देण्याचा मिळाला अधिकार:सागरी संशोधक डॉ सारंग कुलकर्णी यांची माहिती

मालवण (प्रतिनिधी)

तारकर्ली येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या इसदाला जलपर्यटन प्रशिक्षण संस्था म्हणून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाची मान्यता मिळाली आहे. यामुळे इसदा मध्ये जलपर्यटन प्रशिक्षण सुविधा उपलब्ध होणार असून बोट चालविणे, जेट स्की चालविणे, जीवसुरक्षा याचे प्रशिक्षण घेणे आणि त्याचे प्रमाणपत्र मिळणे स्थानिकांना स्वस्त आणि सुलभ होणार आहे. यामुळे सिंधुदुर्गसह कोकणवासियांना हक्काची जलपर्यटन प्रशिक्षण संस्था मिळाली आहे, अशी माहिती प्रसिद्ध सागरी संशोधक डॉ. सारंग कुलकर्णी यांनी दिली आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने महाराष्ट्रामध्ये जलपर्यटन विकसित करण्याच्या दृष्टीने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कूबा डायव्हिंग अँड अॅक्वाटिक स्पोर्टस (IISDA- इसदा) हि आंतरराष्ट्रीय दर्जाची जल पर्यटन प्रशिक्षण संस्था २०१५ मध्ये तारकर्ली येथे निर्माण करून प्रचलित केली. इसदा जलपर्यटन प्रशिक्षण केंद्र भारतातील पहिले आणि आशिया पॅसिफिक क्षेत्रातील मोठ्यापैकी एक केंद्र आहे. पर्यटन विकास महामंडळाच्या इसदामधील पायाभूत सुविधा आणि तांत्रिक आणि अनुभवी मनुष्यबळ उच्च दर्जाचे आहे. स्थापनेपासून गेल्या ८ वर्षात इसदाने यशस्वीरीत्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला वैशिष्ट्यपूर्ण सागरी पर्यटनामध्ये प्रस्थापित केले आहे. इसदाने जलपर्यटन, समुद्री जीव संवर्धन, कौशल्य विकास आणि पाण्याशी निगडीत आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रामध्ये अल्पावधीतच स्वतःचे राष्ट्रीय पातळीवर महत्वाचे स्थान निर्माण केले आहे.

इसदाने हजारो विद्यार्थी, पर्यटक, स्थानिक युवक, वन खात्याचे अधिकारी, भारतीय वायू दलाचे अधिकारी यांना स्नॉर्कलिंग, स्कूबा डायव्हिंग, समुद्री संशोधन, लहान बोटी प्रचलन इत्यादीचे प्रशिक्षण दिले आहे. तसेच इसदामुळे सिंधुदुर्ग जिल्हा स्कूबा आणि जल पर्यटनच्या जागतिक नकाशावर आला. या उपक्रमामुळे सिंधुदुर्ग मध्ये हजारो स्थानिकांना शाश्वत रोजगार मिळाला आणि सागरी पर्यटनावर आधारित मोठी अर्थव्यवस्था नव्याने उभी राहिली.

परंतु इसदाला जलपर्यटनातील महत्वाचे घटक म्हणजे बोट चालविणे, जेट स्की चालविणे, जीव सुरक्षा याचे स्वतः प्रशिक्षण देऊन प्रमाणपत्र देण्यास अद्याप महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाची मान्यता नव्हती. त्यामुळे संस्थेचे प्रशिक्षण बहुंताशी स्कूबा डायव्हिंगशी मर्यादित होते. स्थानिकांना या प्रशिक्षणासाठी बाह्य प्रशिक्षणावर अवलंबून राहावे लागत होते व प्रशिक्षण खूप खर्चिक होत असे. तसेच प्रमाणपत्र मिळण्यास आणि प्रमाणपत्राचे नुतनीकरण करण्यास विलंब लागत होता. त्यामुळे कोकण आणि महाराष्ट्रात जल पर्यटन बहरत असताना जल पर्यटन क्षेत्रातील शासनाच्या प्रशिक्षण संस्थेची उणीव प्रकर्षाने जाणवत होती. हि बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी शर्मा यांच्या प्रयत्नाने महामंडळाने महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाला प्रस्ताव पाठविला होता. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने सकारात्मक पाऊले उचलून, शासकीय जल पर्यटन प्रशिक्षण संस्थ्येची गरज ओळखून आणि इसदाच्या पायाभूत सुविधा आणि अनुभवाचा अभ्यास करून इसदाला बोट चालविणे, जेट स्की चालविणे, जीवसुरक्षा याचे प्रशिक्षण देणे आणि त्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी मान्यता दिली आहे.

स्थानिकांना जल पर्यटनासाठी लागणारे प्रशिक्षण किफायतशीर दरात तसेच हवे तेव्हा मिळणार आहे आणि प्रशिक्षणानंतर प्रमाणपत्र तात्काळ मिळणार आहे. त्यामुळे स्थानिकांना जल पर्यटन व्यावसायिक आणि सुरक्षतेच्या दृष्टीने व्यवस्थित चालवायला मिळणार आहे. आता सिंधुदुर्ग आणि कोकणवासियांना जल पर्यटनासाठी हक्काची प्रशिक्षण संस्था मिळाली आहे. याचा फायदा भविष्यात उच्च दर्जाचे, व्यावसयिक, कायदेशीर आणि सुरक्षित जल पर्यटन विकसित करण्यासाठी होईलच तसेच स्थानिकांना जल पर्यटनाच्या माध्यमातून शाश्वत रोजगार मिळण्यास मदत होईल. तसेच भविष्यात शासनाला स्थानिकांसाठी जल पर्यटन क्षेत्रातील विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे सोयीस्कर होणार आहे.

You cannot copy content of this page