नागरिक त्रस्त:जागोजागी साचले आहे पाणी
कुडाळ ता.०७-:
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे बळीराजा आनंदीत झाला आहे. मात्र, मुसळधार पावसामुळे कुडाळ शहराची झालेली स्थिती दयनीय आहे. कुडाळ शहरात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने याचा त्रास सामान्य नागरिकांना होत आहे. कुडाळ नगरपंचायतने काही महिन्यांपूर्वीच नालेसफाई केल्याचे स्पष्ट केले होते. परंतु, कुडाळ शहरातील काळप नाका, राणे पेट्रोलपंप, नवीन एसटी स्टँड येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचून त्याचा परिणाम नागरिकांना भोगावा लागत आहे. या भागात पाणी रस्त्यावर साचल्याने कुडाळ शहराला ‘तुंबई’ म्हणायची वेळ आली आहे.
या भागात गटारे नसल्याने पाणी रस्त्यावर साचून राहिलेय. यामुळे वाहनधारकांना तसेच ये-जा करणाऱ्या नागरिकांना या पाण्यातूनच मार्ग काढावा लागत आहे.
काळप नाका, राणे पेट्रोलपंप येथे पाण्याचा निचरा होण्यासाठी गटार नसल्याने ही स्थिती निर्माण झालीय. याबाबत कुडाळ नगरपंचायत प्रशासनाने पावसाळ्यापूर्वीच या गटारांची सफाई करणे गरजेचे होते. परंतु, प्रत्यक्षात या गटारांची सफाई न झाल्यामुळे किंवा गटारे बांधण्यात आली नसल्याने मार्गावर पाणी साचण्याच्या घटना घडल्या आहेत.
