⚡मालवण ता.०६-: रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांनी रत्नागिरी जिल्हास्तरीय पर्यटन उपसमिती सदस्यपदी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू उर्फ बाबा मोंडकर यांची नियुक्ती केली आहे. १३ सदस्य या समितीत असून या समितीचे अध्यक्ष पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक (मुंबई) हे असणार आहेत.
यासंबंधी बाबा मोंडकर यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी यांचे आभार मानले आहेत. रत्नागिरी जिल्हा पर्यटन विकास आराखडा बनविताना येत्या काळात रत्नागिरी जिल्ह्यासोबत संपूर्ण कोकणच्या पर्यटन व्यवसाय वाढीसाठी हा विकास आराखडा मार्गदर्शक ठरेल. यासाठी पर्यटन व्यावसायिक महासंघ पूर्णपणे प्रशासनासोबत राहून स्थानिक पर्यटन व्यावसायिक व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने रत्नागिरी जिल्हा पर्यटन विकास आराखड्याची कटिबद्ध आहे, असे मोंडकर यांनी सांगितले.
या समितीच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्याचा पर्यटन विकास आराखडा बनविला जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करताना पर्यटन क्षेत्रातील शक्तीस्थानाचा विचार करतानाच कच्चे दुवेही अधोरेखित करून त्यावर उपाययोजना सूचवून जिल्ह्याचा विकास आराखडा बनवायचा आहे. हा आराखडा तयार झाल्यानंतर तो इतरांसाठी पथदर्शी ठरेल, असा असावा हा मुख्य उद्देश आहे.
