वाचनामुळे वैचारिक प्रगल्भता येते…

पी.जे.कांबळे :कणकवली नगर वाचनालयात बाल कुमार कट्टयाचे उद्घाटन

⚡कणकवली ता.०६-: पुस्तकांचे सातत्याने वाचन केल्यामुळे वैचारिक प्रगल्भता येते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी
पुस्तकांचे वाचन करावे. विद्यार्थ्यांना पुस्तक वाचनाची आवड निर्माण व्हावी,याकरिता कणकवली नगर वाचनालयात बाल कुमार कट्टा हा विभाग सुरु करण्यात आला आहे, याचा
लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक तथा वाचनालयाच्या कार्यकारिणीचे सदस्य पी.जे.कांबळे यांनी केले.

कणकवली नगरवाचनालयात विद्यार्थ्यांसाठी बाल कुमार कट्टा विभाग सुरु करण्यात आला आहे. याचा शुभारंभ पी.जे.कांबळे यांच्या हस्ते या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी वाचनालयाचे कार्यवाह हनीफ पीरखान,सहकार्यवाह डी. पी. तानवडे,वैजयंती करंदीकर, विद्यामंदिर शिक्षिका स्नेहा सावंत व ग्रंथालयाचे कर्मचारी,विद्यार्थी
उपस्थित होते.
कणकवली नगर वाचनालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम राबविले जातात. या वाचनालयात वाचनासाठी विद्यार्थी यावेत. त्यांच्या शिक्षणात बौद्धिकतेची भर पडावी. या हेतूने हे वाचनालय काम करत असल्याचे सहकार्यवाह डी.पी.तानवडे यांनी सांगीतले.
स्नेहा सावंत म्हणाल्या,ग्रंथ हेच गुरू हे वाचनालयाचे घोष वाक्य आहे. सुदैवाने आपल्या शाळेच्या शेजारीच हे सुसज्ज असे वाचनालय आहे.शाळेतील पुस्तकांन सोबतच विविध पुस्तके या ठिकाणी तुम्हाला वाचनासाठी उपलब्ध केली आहेत.याबरोबर मोबाईल द्वारे कधीतरी चुकीचे ज्ञान देखील मिळते.यामुळे पुस्तक वाचनातून मिळणारे ज्ञान हे अचूक असल्याने त्याचा फायदा निश्चितच विद्यार्थ्यांना होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, वाचनालयात सुरु करण्यात आलेला बाल कुमार कट्टा विभागात विविध गोष्टींची व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असलेली पुस्तके ठेवण्यात आली आहेत.ही विद्यार्थ्यांनी हाताळली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार वाचनालयाच्या कर्मचारी कोकणे यांनी केले.

You cannot copy content of this page